मोबाइल फोडल्याच्या रागातून बालकाचे वडापावचे आमिष दाखवून अपहरण
By उद्धव गोडसे | Published: August 1, 2023 09:37 PM2023-08-01T21:37:52+5:302023-08-01T21:38:07+5:30
संशयितास १८ तासात अटक, बालकाची सुखरुप सुटका
उद्धव गोडसे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: बांधकामावर काम करणा-या सहका-याने मोबाइल फोडल्याच्या रागातून त्याच्या तीन वर्षीय बालकाला वडापावचे आमिष दाखवून अपहरण करणा-या संशयितास पोलिसांनी १८ तासात पकडून बालकाची सुखरूप सुटका केली. मानतेश उर्फ संजू बसलिंगाप्पा व्हारांटे (वय ३३, रा. सुंदोळे, ता. गोकाक, जि. बेळगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. व्हारांटे याला पोलिसांनी मंगळवारी (दि. १) सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून अटक केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी क-याप्पा सिद्धाप्पा मळगली (सध्या रा. महालक्ष्मी पार्क, संदीप बेकरीजवळ, रामानंदनगर, कोल्हापूर) यांचा तीनवर्षीय मुलगा रायाप्पा हा सोमवारी (दि. ३१) सायंकाळी अचानक घरातून बेपत्ता झाला. आसपास शोध घेऊनही तो सापडत नसल्याने अखेर क-याप्पा यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या.
संशयित अपहरणकर्ता मानतेश हा मंगळवारी सकाळी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. गोकाकहून कोल्हापूरला आलेल्या बसमधून उतरताच मानतेश याला बालकासह ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने क-याप्पा याने मोबाइल फोडल्याच्या रागातून त्याच्या मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली. उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह राम कोळी, दीपक घोरपडे, सागर माने, संजय कुंभार, प्रीतम मिठारी, सागर डोंगरे, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.