बारलोणीत बंद घर दिवसा फोडले; दागिन्यांसह रोकडवर डल्ला मारला

By काशिनाथ वाघमारे | Published: April 15, 2023 06:46 PM2023-04-15T18:46:46+5:302023-04-15T18:47:05+5:30

दोन्ही घराची कुलपं तोडलेली दिसली. घरात डोकावले असता दोन लोखंडी कपाटे, लाकडी कपाट व बेडचे फर्निचरचे कप्पे उघडून त्यातील सामान अस्ताव्यस्त टाकलेले होते.

A closed house in Barloni was broken into during the day; Cash along with jewelery was stolen | बारलोणीत बंद घर दिवसा फोडले; दागिन्यांसह रोकडवर डल्ला मारला

बारलोणीत बंद घर दिवसा फोडले; दागिन्यांसह रोकडवर डल्ला मारला

googlenewsNext

सोलापूर : दिवसा ढवळ्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह जवळपास पाच लाखांचा ऐवज चोरून नेला.
ही घटना गुरुवार, १३ एप्रिल रोजी सकाळी १० ते दु.२.३० सुमारास माढा तालुक्यात बारलोणी येथे घडली. याबाबत अभिमान गजराव मोरे (रा.बारलोणी ता.माढा) यांनी फिर्याद दिली आहे.

 पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी मोरे यांची काशीद वस्ती आणि बारलोणीत घराशेजारी अशा दोन ठिकाणी शेती आहे. गुरुवार सकाळी ८ वाजता अभिमान माेरे आणि त्यांची पत्नी शारदा व मुलगा सुमीत हे तिघेजण काशीद वस्ती येथील शेतात उसाची लागन चालू असल्याने तिथे गेले होते.

 अभिमान यांच्या आई पार्वती या घराशेजारील शेतात खुरपणीसाठी आलेल्या महिला मजुरांसोबत होत्या. मात्र, घरी कोणीच नसल्याने कुलपं लावली होती. दरम्यान कामाला लावलेल्या महिलांची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर फिर्यादीच्या आई घराकडे जनावरांना पाणी पाजण्यासाठी आल्या असता त्यांना दोन्ही घराची कुलूपं तोडलेली दिसली.
हे पाहून आईने दुपारी अभिमान यांना फोन करुन याची माहिती दिली. फिर्यादी, त्यांची पत्नी व मुलगा यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दोन्ही घराची कुलपं तोडलेली दिसली. घरात डोकावले असता दोन लोखंडी कपाटे, लाकडी कपाट व बेडचे फर्निचरचे कप्पे उघडून त्यातील सामान अस्ताव्यस्त टाकलेले होते. शेतीच्या कामाकरीता बँकेतून काढुन आणून कपाटात ठवेलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

या घटनेनंतर श्वान पथक, ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ.विशाल हिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.अधिक तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे करीत आहेत.

अंगठ्या, लॉकेट गंठणवर डल्ला
 रोख रक्कम १ लाख १५ हजार, १ लाख ६० हजार रुपये किमतीचे चार तोळे सोन्याच्या बांगड्या, १ लाख २० हजारांचे तीन सोन्याचे लाॅकेट, ८० हजारांचे दोन तोळे सोन्याचे गंठण, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे एकूण ४ लाख ९५ हजार रुपयांचे ऐवज लंपास झाला आहे.

Web Title: A closed house in Barloni was broken into during the day; Cash along with jewelery was stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :theftचोरी