बॉयफ्रेंडसाठी कायपण! कॉलेज युवतीचा कारनामा ऐकून पोलिसांनीही डोक्यावर हात मारला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 10:33 AM2023-07-31T10:33:09+5:302023-07-31T10:33:40+5:30
अटक केलेली आरोप युवती ही मूळची शाहजहापूरची रहिवासी मनस्वी शुक्ला उर्फ गुनगुन आहे
नवी दिल्ली – नोएडातील सेक्टर ७६ मध्ये आम्रपाली प्रिंसले इस्टेट सोसायटीबाहेर ३० जूनच्या रात्री सॉफ्टवेअर इंजिनिअर अनमोल मित्तल यांचे अपहरण करून क्रेटा आणि कॅश लुटण्यात आली होती. या घटनेत पोलिसांनी तपास करून यामागील मास्टरमाईंड युवतीला अटक केली आहे. आरोपी युवती केवळ १८ वर्षाची असून दिल्लीच्या हंसराज कॉलेजमध्ये ती बीटेकचे शिक्षण घेते.
तपासात युवतीने पोलिसांना सांगितले की, माझ्या बॉयफ्रेंडने एक सर्व्हिस प्रोव्हायडिंग कंपनी सुरू केली होती. त्यात त्याला मोठे नुकसान झाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी आणि स्वत:चे खर्च पूर्ण करण्यासाठी युवतीने ही लूट करण्याचे प्लॅनिंग केले. पोलिसांनी या घटनेत युवतीच्या बॉयफ्रेंडलाही अटक केली आहे. पोलिसांनी युवतीकडून चोरीच्या वस्तू जप्त केल्या आहेत. त्यात इंजिनिअरकडून लुटलेली चेन, मोबाईल आणि २० हजार रुपयांची रोकड यांचा समावेश आहे.
एसपी ३ सौम्या सिंह यांनी सांगितले की, अटक केलेली आरोप युवती ही मूळची शाहजहापूरची रहिवासी मनस्वी शुक्ला उर्फ गुनगुन आहे. नातेवाईकांनी तिला दिल्लीत बीटेकच्या शिक्षणासाठी पाठवले होते. याठिकाणी इटावात राहणाऱ्या अमित उपाध्यायसोबत तिची ओळख झाली. अमित मथुरातील एका कॉलेजमध्ये बीटेकचे शिक्षण घेत होता. दोघेही नोएडातील सेक्टर १२२ मध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वी अमितने ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हायडिंग कंपनी उघडली होती. त्यात बेरोजगारांना कंपनीत नोकरी देण्याचे काम केले जात होते. मात्र या कंपनीत नुकसान झाले. त्यामुळे काही सामान विकावेही लागले. नुकसान भरपाईची रक्कम मोठी असल्याने युवतीने लूट करण्याचं प्लॅनिंग आखले.
रिकवरी एजेंट सांगून गुन्हेगार बनवलं
या प्लॅनिंगनुसार, ज्या लोकांकडून नोकरी लावण्याच्या बहाण्याने पैसे घेतले होते त्यांनाच सहभागी करून घेतले. बँकेत रिकवरी एजेंटचे काम आहे असं सांगून त्यांना फसवले. त्यानंतर मनस्वीने अनमोल मित्तल यांना टार्गेट केले. या घटनेनंतर दोघेही फरार होते. पोलिसांनी दोघांना पकडण्यासाठी प्रत्येकी २० हजारांचे बक्षीस ठेवले. आरोपींकडून प्रथम क्रेटा कार जप्त केली. माहितीनुसार, सॉफ्टवेअर इंजिनिअर अनमोल मित्तल हे त्यांच्या कारमधून सोसायटीच्या बाहेर आले. काही खाण्याचे सामन घेऊन ते कारमध्ये बसले. त्याठिकाणी लुटीच्या इराद्याने मनस्वी उभी होती. अनमोलशी बोलण्याचा बहाणा करून ती पुढच्या सीटवर बसली. त्यानंतर काही लोक मागच्या सीटवर आले आणि अनमोलला बंधक बनवले. त्याच्याकडून मोबाईल, सोन्याची चेन, अंगठी लुटली. त्यानंतर जवळच्या एटीएमवर घेऊन जात त्याच्याकडून ५० हजार रुपये बळजबरी घेतले.
कोल्हापूरहून नोएडात आल्यावर जेरबंद
या प्रकारानंतर आरोपी मनस्वी पोलिसांपासून वाचण्यासाठी पळत होती. ती हरिद्वार, ऋषिकेश, नाशिक आणि कोल्हापूरमध्ये राहिली. काही कामानिमित्त रविवारी नोएडात पोहचली. तेव्हा पोलिसांना खबर मिळताच तात्काळ पोलिसांनी तिला जेरबंद केले. मनस्वी दिल्लीच्या हंसराज कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. परंतु तिच्याकडे २ आधार कार्ड सापडले. ज्यात एकात वय १८ वर्ष तर दुसऱ्यात २३ वर्ष लिहिले आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून आणखी माहिती गोळा करत आहे.