...अन्यथा मी मरेन म्हणत कॉलेजमधून तरुणीचे अपहरण; त्यानंतर बळजबरीने ‘कोर्ट मॅरेज’, अमरावतीमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 06:10 PM2023-01-01T18:10:47+5:302023-01-01T18:10:59+5:30
२२ वर्षीय तरूणी शहराच्या मध्यवस्तीतील एका कॉलेजची विद्यार्थीनी आहे.
अमरावती: तू माझ्याशी लग्न केले नाही, तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी देऊन एका कॉलेजकन्येला पळवून नेण्यात आले. कॉलेजमधून अपहरण करून तिच्याशी कोर्ट मॅरेज करण्यात आले. हा धक्कादायक प्रकार शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला. याप्रकरणी पिडित कॉलेजकन्येच्या तक्रारीवरून आरोपी पवन बाळू अनभोरे (२४, रा. सांगळूद, ता. दर्यापूर) याच्याविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, २२ वर्षीय तरूणी शहराच्या मध्यवस्तीतील एका कॉलेजची विद्यार्थीनी आहे. तर आरोपी पवन हा तिचा नातेवाईक असून, सुमारे चार महिन्यांपासून ते परस्परांना ओळखू लागले. दोघांमध्ये संवाद वाढला. सोशल मिडियावर ते व्यक्त होऊ लागले. मुलगी आपल्यावर प्रेम करते, ती लग्न करण्यासही तयार आहे, असा एकतर्फी विचार करून आरोपी पवनने १० नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास तिचे कॉलेज गाठले. जबरदस्तीने दुचाकीवर बसवून तो तिला जिल्हाधिकारी कार्यालय स्थित विवाह नोंदणी उपनिबंधक कार्यालयात घेऊन गेला. त्याने तेथे बळजबरीने दोघांच्या विवाहाची आगाऊ नोंदणी केली. ही बाब तिने भितीपोटी कोणालाही सांगितली नाही. मात्र ती कुढत राहिली. सांगावे तर कसे, असा यक्षप्रश्न तिच्यासमोर उभा ठाकला.
महिन्याभरानंतर केला नोंदणी विवाह
२२ डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास ती कॉलेजवरुन घरी परत जात असतांना आरोपी त्याच्या दुचाकीने आला. तुला माझ्या सोबत कोर्ट मॅरेज करावेच लागेल, नाहीतर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करेन, तुला खोट्या गुन्हयात फसवेन, असे म्हणून तो तिला जबरदस्तीने त्याच्या दुचाकीवर बसवून कलेक्टर ऑफीस येथील विवाह नोंदणी कार्यालयात घेऊन गेला. ती घाबरल्याने तिने आरडाओरडा केला नाही. त्याने तेथे तिच्याशी जबरदस्ती नोंदणी विवाह केला. मात्र, तो विवाह तिला मान्य नसल्याने तिने मनाचा हिय्या करत ३१ डिसेंबर रोजी शहर कोतवाली पोलीस ठाणे गाठले. तिची आपबिती ऐकल्यानंतर पोलिसांनी रात्री ९ च्या सुमारास गुन्हा दाखल केला.
पिडिताने गाडगेनगर पोलिसांत दिलेला तक्रार अर्ज व बयानावरून आरोपीविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला. आरोपीने बळजबरीने नोंदणी विवाह केल्याचे पिडिताचे म्हणणे आहे. पुजा खांडेकर, सहायक पोलीस निरिक्षक, कोतवाली.