श्वानाला अपंग करणाऱ्यावर गुन्हा! साकीनाका पोलिसांकडून तपास सुरू
By गौरी टेंबकर | Published: March 16, 2024 03:40 PM2024-03-16T15:40:50+5:302024-03-16T15:41:17+5:30
याप्रकरणी एका सॉफ्टवेअर इंजिनियरने साकीनाका पोलिसात तक्रार दिली आहे.
मुंबई: साकीनाका परिसरात एका श्वानाच्या पायावरून गाडी नेत त्याला अपंग करणाऱ्या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी एका सॉफ्टवेअर इंजिनियरने साकीनाका पोलिसात तक्रार दिली आहे.
तक्रारदार अंकित शर्मा (३४) यांच्या तक्रारीनुसार, साकीनाका परिसरात त्यांच्या कारने १४ मार्च रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पत्नीसोबत निघाले होते. एका ठिकाणी त्यांना गर्दी दिसल्याने त्यांनी गाडी थांबवली आणि ते दोघेही काय झाले हे पाहण्यासाठी खाली उतरले. तेव्हा एक तांबूस रंगाचे भटके श्वान विकलांग अवस्थेत त्यांना त्याठिकाणी दिसले. तेव्हा त्यांनी आसपासच्या लोकांकडे याबाबत विचारणा केली ज्यांनी एक चारचाकी गाडीचा चालक त्याची गाडी शिवाई इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात पार्किंग करत असताना श्वानाच्या अंगावरून गाडीचे डावीकडचे चाक गेले. या अपघातात श्वानाचा पाय मोडला असे सांगितले.
तिथल्या सुरक्षारक्षकाने त्या जखमी श्वानाला उचलून जवळच असलेल्या कचराकुंडीकडे ठेवले. त्यानंतर तक्रारदार घरी निघून गेले आणि नंतर मित्रासोबत जाऊन त्यांनी सदर कारचालकाच्या विरोधात तक्रार दिल्यावर साकीनाका पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४२९ आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम ११(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला.