वृध्दाला लुटणाऱ्या रेकाॅर्डवरील गुन्हेगारास अटक, सांगली घडली घटना
By शरद जाधव | Updated: September 23, 2023 21:02 IST2023-09-23T21:01:46+5:302023-09-23T21:02:38+5:30
गुलाब कॉलनीतील घटना; २४ हजारांचा ऐवज हस्तगत

वृध्दाला लुटणाऱ्या रेकाॅर्डवरील गुन्हेगारास अटक, सांगली घडली घटना
शरद जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: शहरातील गुलाब कॉलनी परिसरात वृध्दाच्या हातातील अंगठी जबरदस्तीने काढून घेत पसार झालेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास पोलिसांनी जेरबंद केले. अनिल विश्वास चौगुले (वय ५०, रा. डुबल धुळगाव, ता. तासगाव) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून २४ हजार रुपये किंमतीची अंगठी हस्तगत करण्यात आली आहे.
शहरातील शंभरफूटी रस्त्यावरील गुलाब कॉलनी परिसरात मधुकर भाऊराव जोशी (वय ८५) हे कट्ट्यावर बसले होते. यावेळी संशयित तिथे आला आणि त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेऊन पसार झाला होता.
एसलीबीचे पथक शहरात गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, संशयित चौगुले हा भारत सुतगिरणी परिसरात सोने विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिस पथकाने तिथे जात चौगुले याला ताब्यात घेतले.
यावेळी त्याने जोशी यांना लुटल्याची कबुली दिली. संशयित चौगुले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात चोरी, घरफोडीसारखे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, कुमार पाटील, सागर लवटे, संदीप गुरव, अमर नरळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.