स्वस्तात म्हाडाचा फ्लॅट देतो सांगून एक कोटी उकळले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 01:29 PM2024-11-02T13:29:52+5:302024-11-02T13:29:59+5:30
तक्रारदार हे सोन्याच्या दागिन्याच्या कंपनीत मार्केटिंग मॅनेजर आहेत.
मुंबई : मालाडमध्ये स्वस्तात म्हाडाचा फ्लॅट मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत चौघांनी एका व्यावसायिकाची एक कोटी दोन लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांत दाखल झाला आहे.
तक्रारदार हे सोन्याच्या दागिन्याच्या कंपनीत मार्केटिंग मॅनेजर आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांची २०१९ मध्ये आरोपी सचिन धुरी, योगेश पोटे, महादेव बोधले आणि सतीश जाधव यांच्याशी ओळख झाली. योगेश पोटे याने उर्वरित दोघे हे म्हाडाच्या सदनिका सोडत वितरण विभागात दुय्यम दर्जाचे अधिकारी असल्याचे त्यांना सांगितले होते. तुम्हाला बाजारभावापेक्षा स्वस्तात सदनिका म्हाडामधून मिळवून देतो, असे आरोपींनी तक्रारदाराला सांगितले.
तक्रारदाराला त्यांनी चिंचोली बंदर येथील एका रेस्टॉरंटमध्ये बोलवून म्हाडा लाभार्थ्याशी भेट घडवून आणली. जो गिरणी कामगार असल्याचेही त्यांना सांगितले शिवाय लाभार्थ्याला रोख पैसे द्यावे लागतील, असे सांगत आरोपींनी त्यांच्याकडून १ कोटी २ लाख उकळले. मात्र, त्यांना फ्लॅट दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.