दारूमुक्ती केंद्रातून परतला, नशेत संपूर्ण कुटुंब संपविले; आई, वडील, बहीण आणि आजीची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 08:23 AM2022-11-24T08:23:50+5:302022-11-24T08:30:06+5:30
केशवने कुटुंबीयांवर चाकूने अनेक वार केले. त्यानंतर तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला चुलत भावाने पकडले व पोलिसांच्या हवाली केले.
नवी दिल्ली: दिल्लीच्या पालम भागामध्ये एका व्यक्तीने आपल्या कुटुंबातील चार लोकांची हत्या केली. या आरोपीचे नाव केशव असून, त्याने नशेत असताना हे कृत्य केले. त्याला घरच्या लोकांनी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठविले होते. पण तरीही त्याच्यात काहीही सुधारणा झाली नव्हती. केंद्रातून परतल्यानंतर त्याने दारूसाठी पैशांकरिता तगादा लावणे सुरू केले. घरच्यांनी पैसे देण्यास साफ नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने कुटुंबातील सर्वांची हत्या केली.
केशवने कुटुंबीयांवर चाकूने अनेक वार केले. त्यानंतर तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला चुलत भावाने पकडले व पोलिसांच्या हवाली केले. केशवने आपले वडील दिनेश, आई दर्शना, बहीण उर्वशी, आजी दिवानादेवी या चौघांची हत्या केली. पोलिसांना दोन मृतदेह प्रसाधनगृहात व दोन मृतदेह घरातील एका खोलीत आढळले. केशव याला कायमस्वरूपी नोकरी नव्हती. महिनाभरापूर्वी त्याने नोकरी सोडली होती.
किंकाळी ऐकून सावध -
केशवच्या बहिणीने फोडलेली किंकाळी ऐकून चुलत भाऊ काहीजणांसह तिथे गेले. तेव्हा दार न उघडताच केशव म्हणाला की, आमचे घरगुती भांडण आहे, तुम्ही मध्ये पडू नका. थोड्या वेळाने केशव पळून जाऊ लागला. त्यावेळी चुलत भाऊ व काही लोकांनी त्याला पकडले. तोवर त्याने चौघांना ठार मारले होते.