अनेक वर्षांपासून फरार असलेला ड्रग्स माफिया अखेर बायकोमुळे आला अडचणीत, झाली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 04:37 PM2024-01-01T16:37:51+5:302024-01-01T16:59:17+5:30
अवघ्या २२ वर्षांचा आरोपी झाला जेरबंद
Drugs Smuggler Arrested: चोर आणि पोलिस यांच्यातील लपंडावाच्या बातम्या आपण रोजच वाचतो. पोलिस चोरांचा पाठलाग करतात आणि चोरांना पकडून तुरूंगात टाकतात. इतकेच नव्हे तर सापळा रचूनही अनेक चोरांना अडकवले जाते. पण अनेक वर्षांपासून पोलिसांना चकवणारा आणि फरार असणारा आरोपी आपल्या पत्नीमुळे पकडला गेला असं जर तुम्हाला समजलं तर नक्कीच याबाबत अधिक वाचायची उत्सुकता वाटेल ना... गेल्या अनेक वर्षांपासून एक ड्रग माफिया फरार होता. कितीही प्रयत्न केला तरी तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पण नुकताच इंटरपोलने त्या ड्रग माफियाला पकडले आणि अटक केली. महत्त्वाची बाब म्हणजे तो पकडला गेला त्यामागे त्याची बायको कारणीभूत ठरली.
गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या ड्रग माफियाला इंटरपोलने पकडले. पत्नीच्या गरोदरपणात तिला भेटायला आलेला असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अटक केली. इंटरपोलला टीप मिळाली होती की, त्याची पत्नी एका मुलाला जन्म देणार आहे आणि त्यासाठी तो हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला येणार आहे. त्यामुळे माहिती मिळताच इंटरपोलच्या टीमने सापळा रचला आणि फरार असलेला उरुग्वेचा ड्रग माफिया डिएगो निकोलस मार्सेट अल्बा याला अखेर ब्राझीलमधून अटक करण्यात आली.
ड्रग माफिया डिएगो मार्सेट ब्राझील, बोलिव्हिया, पॅराग्वे आणि उरुग्वेमध्ये आपली ओळख बदलून वर्षानुवर्षे जगत होता. डिएगो दक्षिण अमेरिकेत मोठा व्यवसाय करतात. डिएगो हा सुरूवातीला ड्रग स्मगलर होता आणि त्याने ड्रग्ज तस्करांच्या मोठ्या नेटवर्कशी जवळून काम केले होते. हे नेटवर्क दक्षिण अमेरिकेतून युरोपात मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची तस्करी करत असे. २२ वर्षीय डिएगो केवळ ड्रग्सच्या तस्करीतच गुंतला नव्हता, तर तो अनेक हाय-प्रोफाइल खूनांमध्येही सामील होता अशी माहिती मिळाली.
मार्सेटची पत्नी तपासणीसाठी ब्राझीलमधील रुग्णालयात जात असल्याची इंटरपोलने सामायिक केलेल्या गुप्तचर माहितीमुळे डिएगोच्या अटकेची सोय झाली. प्रसूतीची तारीख जवळ आल्याने तिला नियमित रुग्णालयात जावे लागत होते. इंटरपोलला ही माहिती मिळाली. ब्राझील पोलिसांना संशय आल्यावर त्याच्या पत्नीवर स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. डिएगो स्वत: पत्नीसोबत घरी राहत असल्याचे समोर आले. त्यानंतर इंटरपोलच्या पथकाने अटक केले.