पंतप्रधान कार्यालयाच्या नावे बनावट ई-मेल; सीबीआयकडून गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 09:17 AM2023-03-04T09:17:42+5:302023-03-04T09:17:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पंतप्रधानांच्या कार्यालयात महत्त्वाचे अधिकारी असल्याचे भासवत आणि पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळाशी साधर्म्य साधणारा ई-मेल आयडी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पंतप्रधानांच्या कार्यालयात महत्त्वाचे अधिकारी असल्याचे भासवत आणि पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळाशी साधर्म्य साधणारा ई-मेल आयडी तयार करणाऱ्या तीन जणांच्या विरोधात सीबीआयने दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे. या भामट्यांनी दिल्ली, बंगळुरू आणि अन्य काही शहरांतील लोकांना या बनावट ई-मेल आयडीवरून संदेश पाठविल्याचे दिसून आले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी काही लोकांना पंतप्रधान कार्यालयातून ई-मेल संदेश प्राप्त झाले होते. या संदेशाद्वारे तातडीने काही व्यक्तींना संपर्क करण्याचे सूचित करण्यात आले होते. तसेच, तुमचा फोन बंद असल्याने फोनवर बोलणे होत नाही, असे देखील कारण या ई-मेलमध्ये स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, थेट पंतप्रधान कार्यालयातून ई-मेल आल्यामुळे चक्रावून गेलेल्या या लोकांनी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधत तेथे विचारणा केली. परंतु, त्या ई-मेलवर ज्यांचे नाव आहे, अशा व्यक्ती पंतप्रधान कार्यालयात कार्यरत नाहीत तसेच ज्या ई-मेल आयडीवरून (@pmo.in) हा ई-मेल आलेला आहे तो देखील पंतप्रधान कार्यालयाचा नसल्याचे पीएमओमधील अधिकाऱ्यांनी या लोकांना सांगितले.
आरोपींचा शोध सुरू
पंतप्रधान कार्यालयातील सहसंचालकाने पत्राद्वारे ही बाब सीबीआयच्या निदर्शनास आणून दिली. त्याची दखल घेत सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, चार महिन्यांपूर्वी देखील तीन लोकांनी देशातील काही मोठ्या व्यावसायिकांना आपण पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगत संपर्क केला होता. त्या प्रकरणात देखील सीबीआयने कारवाई करत या तिनही जणांना अटक
केली होती.