साडेचार हजारांची लाच घेताना महिला लिपिकाला रंगेहात पकडले!
By राजकुमार जोंधळे | Published: July 25, 2023 07:58 PM2023-07-25T19:58:51+5:302023-07-25T19:59:19+5:30
याप्रकरणी लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
लातूर : सर्च रिपोर्ट, सूची क्रमांक- २, मूल्यांकन आणि नकला देण्याच्या कामासाठी साडेचार हजारांची लाच स्वीकारताना निलंगा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील महिला लिपिकाला एसीबीच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.
एसीबीच्या सूत्रांनी सांगितले, निलंगा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला कनिष्ठ लिपिक अश्विनी दत्तात्रय जाधव (४७ रा. आदर्श कॉलनी, लातूर) यांनी तक्रारदाराकडे सर्च रिपोर्ट, सूची क्रमांक- २, मूल्यांकन आणि नकला मिळण्याच्या कामासाठी दाखल केलेल्या वेगवेगळ्या अर्जात माहिती आणि नकाला पुरविण्यासाठी लाचेची मागणी केली.
याप्रकरणी लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. याची पडताळणी केल्यानंतर निलंगा येथे ‘लाचलुचपत विभाग’च्या पथकाने मंगळवारी सापळा लावला. यावेळी कनिष्ठ लिपिक अश्विनी जाधव या तक्राराकडून ४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने पकडले, अशी माहिती उपअधीक्षक पंडित रेजितवाड यांनी दिली. याबाबत निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.