नाशिकमध्ये भरदुपारी पेट्रोलपंपावर महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला
By अझहर शेख | Published: August 25, 2022 05:34 PM2022-08-25T17:34:16+5:302022-08-25T17:34:24+5:30
पाथर्डी-वडनेर रस्त्यावरील एच.पीच्या जाधव पेट्रोलपंपावर गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणे कामकाज सुरु होते.
अझहर शेख
नाशिक - पाथर्डीगाव चौफुलीपासून जवळच वडनेर रस्त्यावर असलेल्या जाधव पेट्रोलपंपावर गुरुवारी (दि.२५) भर दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास येथे वाहनात पेट्रोल भरण्याचे काम करणाऱ्या नोकरदार महिलेवर एकाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याचं महिला गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फरार हल्लेखोर हा महिलेच्या परिचित आहे. त्याची ओळख पटली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पाथर्डी-वडनेर रस्त्यावरील एच.पीच्या जाधव पेट्रोलपंपावर गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणे कामकाज सुरु होते. यावेळी महिला कर्मचारी झुबेदा युसुफ खान (३७,रा.पाथर्डीगाव) या वाहनामध्ये इंधन भरणा करत होत्या. यावेळी पाठीमागील भींतीवरून उडी घेत संशयित हल्लेखोर प्रमोद प्रकाश गोसावी हा हातात मोठा कोयता घेऊन धावत त्यांच्या दिशेने आला. त्याने महिलेवर कोयत्याने वार केला असता त्यांनी तेथून पळ काढल्याने पहिला वार चुकला; मात्र गोसावी याने पुन्हा झुबेदा यांचा पाठलाग करत त्यांच्या पाठीवर कोयता मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी हात मध्ये घातल्याने तो वार हातावर आला. त्या पुन्हा तेथून पळू लागल्या असता पेट्रोल पंपाच्या आवारात त्यांना खाली पाडून पायावर गोसावी याने कोयत्याने वार केले. यावेळी आजुबाजुला असलेले ग्राहक व कर्मचाऱ्यांनी धाव घेत आरडाओरड केली व त्यास रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने गंभीररित्या झुबेदा यांना जखमी करून हातात कोयता नाचवत इतरांना धाक दाखवून तेथून पळ काढला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपला. घटनेची माहिती पेट्रोल पंप व्यवस्थापकाकडून इंदिरानगर पोलिसांना कळविण्यात आली. काही मिनिटांतच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. जखमी महिलेला पेट्रोलपंपावरील अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फरार गोसावीविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या शोधात गुन्हे शाखेसह दोन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.