प्रॉपर्टीच्या वादातून वकिलाच्या ऑफिसमध्येच राडा; चाकू हल्ल्यानं बैठक झाली रक्तरंजित
By योगेश पांडे | Updated: March 21, 2025 23:30 IST2025-03-21T23:29:38+5:302025-03-21T23:30:04+5:30
वकिलाच्या कार्यालयात बिल्डर-प्लॉट डिलर भिडले, दोन पक्षकारांमध्ये वकिलाच्या कार्यालयात राडा, पॉश गोकुळपेठेत खळबळ

प्रॉपर्टीच्या वादातून वकिलाच्या ऑफिसमध्येच राडा; चाकू हल्ल्यानं बैठक झाली रक्तरंजित
योगेश पांडे
नागपूर - प्रॉपर्टीच्या वाद सुरू असताना समझौता बैठकीत दोन्ही पक्षकारांमध्ये जोरदार वाद झाला व एका वकिलाच्या कार्यालयात रक्तरंजित राडा झाला. गोकुळपेठेतील पॉश वस्तीत बिल्डर, वकील आणि प्लॉट डीलर्सच्या उपस्थितीत झालेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एक बिल्डर, वकील तसेच एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या आहेत. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
महेश मासोदकर यांच्या गोकुळपेठ, कॅनॉल रोडवरील कार्यालयात ही घटना घडली. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले आहे. पहिली तक्रार अविनाश कोलतेने (५९, स्नेहनगर) केली आहे. कोलतेचा प्लॉट विक्रीचा व्यवसाय आहे. कोलतेचा बिल्डर संजय धाबेकरसोबत (५८, अंबाझरी ले आऊट) प्रॉपर्टीचा वाद सुरू आहे. त्याच्या समझौत्यासाठी मासोदकर वकिलांच्या कार्यालयात गुरुवारी बैठक बोलविण्यात आली होती. त्यात कोलते व मेहुणा अभिजीत समर्थ (माधवनगरी) हे उपस्थित होते. तर धाबेकरसोबत मासोदकर व प्रकाश वारजूकर हे उपस्थित होते. कोलतेच्या तक्रारीनुसार धाबेकरने बैठकीदरम्यान समर्थवर चाकूने वार केला. त्याला वाचविण्यासाठी कोलतेने धाव घेतली असता वारजूकरने धरून ठेवले व मासोदकरने रॉडने वार केले. यानंतर मासोदरकरने कार्यालय बंद करून कोंडून ठेवले व पोलिसांना फोन केला. कोलतेच्या तक्रारीवरून धाबेकर, मासोदकर व वारजूकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी तक्रार बिल्डर धाबेकरने केली आहे. तक्रारीनुसार बैठकीदरम्यान समर्थने काही दस्तावेज दिले. ते वाचत असताना त्याने धाबेकरचा गळा एका नायलॉनच्या दोरीने आवळला. कोलतेनेदेखील धाबेकर खाली पडल्यावर बेदम मारहाण केली. समर्थने चाकू काढून धाबेकरवर वार केला. त्यात धाबेकरच्या अंगठ्याला जखम झाली. मासोदकर देखील यात जखमी झाल्यावर समर्थ तेथून पळून गेला. कोलतेला खोलीत बंद करून पोलिसांना फोन केला. पोलीस आल्यावर त्यांनी धाबेकरला मेयो इस्पितळात उपचारांसाठी नेले. धाबेकरच्या तक्रारीवरून अभिजीत कोलते व अभिजीत समर्थविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.