परदेशी पायलटने लग्नाचे आमिष दाखवून भाईंदरच्या तरुणीस फसवले 

By धीरज परब | Published: October 30, 2022 11:09 PM2022-10-30T23:09:52+5:302022-10-30T23:10:01+5:30

जेसलपार्क भागात राहणाऱ्या ३६ वर्षीय अविवाहित तरुणीने एका अ‍ॅपवर लग्नासाठी स्वतःची माहिती दिली होती...

A foreign pilot cheated a Bhayander girl with the lure of marriage | परदेशी पायलटने लग्नाचे आमिष दाखवून भाईंदरच्या तरुणीस फसवले 

परदेशी पायलटने लग्नाचे आमिष दाखवून भाईंदरच्या तरुणीस फसवले 

googlenewsNext

मीरारोड - आपण एअर फ्रांसमध्ये वैमानिक असून लग्नासाठी पसंत असल्याचे भाईंदरच्या तरुणीला सांगून तिला पावणे तीन लाखांना फसवल्याचा गुन्हा नवघर पोलिसांनी दाखल केला आहे . 

जेसलपार्क भागात राहणाऱ्या ३६ वर्षीय अविवाहित तरुणीने एका अ‍ॅपवर लग्नासाठी स्वतःची माहिती दिली होती. तिला परदेशातील एका क्रमांकावरून फ्रांसमध्ये राहणाऱ्या व कुमा जॉर्डन, असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीचा व्हॉट्सअ‍ॅप आला. त्याने तरुणीला तिच्या लग्ना बाबतची माहिती वाचली असून लग्नासाठी तू पसंत असल्याचे सांगितले. यानंतर दोघांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप कॉलवरून सातत्याने बोलणे होत असे. 

जॉर्डनने तरुणीला व तिच्या आई वडिलांना भेटण्यासाठी आपण भारतात आलो असून, यलो कार्ड फ्रान्सलाच विसरल्याने दंड भरण्यासाठी ५८ हजार ५०० रुपये आवश्यक असल्याचे तरुणीला सांगितले व या रकमेची मागणी केली. तिने जॉर्डनच्या सांगण्यानुसार ती रक्कम रंजिता कुमार नावाच्या बँक खात्यात ऑनलाईन पाठवली. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा कॉल केला व आपल्याकडे फ्रान्सचे चलन असल्याने ते भारतात चालत नाही. यासाठी आपणास विमानतळावर अडीज लाखांचा दंड केला आहे. तो भरण्यासाठी आपल्याला अडीच लाख रुपयांची आवश्यकता आहे, असे सांगून त्याने पुन्हा तिच्याकडे अडीज लाखांची मागणी केली. तरुणीने रंजिता हिला कॉल केला असता तिने देबोजित दास नावाने असलेल्या खात्याची माहिती पाठवली. त्या खात्यात तरुणीने सव्वा दोन लाख रुपये पाठवले. 

काही वेळाने जॉर्डन याने पुन्हा कॉल करून इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाची साडे सहा लाखांची पेनल्टी लावल्याने ती भरण्यासाठी पुन्हा पैश्यांची मागणी तरुणीकडे केली. मात्र आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगून तरुणीने ते देण्यास नकार दिला. त्याने घेतलेले पैसे फ्रान्सला जाऊन परत देतो, असे सांगितले मात्र नंतर तो बोलणे टाळू लागला. नंतर त्याचा नंबरसुद्धा बंद येऊ लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी तिने नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: A foreign pilot cheated a Bhayander girl with the lure of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.