लिव्ह इनमधील प्रियकरानेच साडेचार वर्षाच्या बालकाला पळविले; आरोपीस अटक
By दयानंद पाईकराव | Published: June 23, 2024 04:19 PM2024-06-23T16:19:14+5:302024-06-23T16:20:03+5:30
शाळेत टाकण्याच्या बहाण्याने बालकाला वर्धाकडे जाणाऱ्या रेल्वेत सोडले
नागपूर : लिव्ह इनमध्ये एका महिलेसोबत राहत असताना तिचा साडे चार वर्षांचा बालक अडसर वाटू लागल्याने प्रियकरानेच या बालकाला वर्धाकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीत सोडून दिले. दरम्यान गणेशपेठ पोलिस आणि गुन्हे शाखा पोलिसांनी या बालकाला सुखरुप नागपूरात आणून आरोपी प्रियकराला गजाआड केले आहे.
आरोपी हंसराज ज्ञानेश्वर दखने (२५, रा. पोरा, ता. लाखनी जि. भंडारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेचे पतीसोबत पटत नसल्यामुळे ती पतीपासून विभक्त राहते. तिला साडे चार वर्षांचा मुलगा आहे. महिनाभरापूर्वी महिलेची आरोपी हंसराजसोबत ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्यामुळे ते लिव्ह इनमध्ये राहु लागले. आरोपीने महिलेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. परंतु महिलेने आपल्या मुलासह स्वीकार करण्याची अट घातली. परंतु साडेचार वर्षांचा बालक आरोपीला अडसर वाटु लागला. त्याने या बालकापासून सुटका करून घेण्याचा बेत आखला.
आरोपीने शुक्रवारी २१ जूनला दुपारी ३ वाजता साडे चार वर्षांच्या बालकाला सोबत घेतले आणि त्याचा शाळेत प्रवेश करून येतो, असे महिलेस सांगितले. परंतु आरोपी हंसराज घरी एकटाच परतला. त्यामुळे महिलेने आपला मुलगा कुठे आहे, अशी विचारना केली. परंतु खापरी येथील स्वामी विवेकानंद हॉस्पीटलजवळील सिटी बसस्टॉप येथे अज्ञात ३ आरोपींनी मुलाला पळवून नेल्याचे आरोपीने महिलेस सांगितले. त्यातील एका व्यक्तीला या मुलाने पप्पा असे म्हटल्याचे त्याने सांगितले. त्यावर महिलेने आपल्या पूर्वीच्या पतीला फोन करून विचारना केली असता त्याने आपण मुलाचे अपहरण केले नसल्याचे त्याने सांगून पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला.
महिलेने गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपी हंसराजला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. आरोपीने नागपूर रेल्वेस्थानकावरून या मुलाला दुपारी ३ वाजता प्लॅटफार्म क्रमांक ४ वर वर्धाकडे जाणाऱ्या गाडीत बसवून दिल्याचे सांगितले. गणेशपेठ पोलिस व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्वरीत दखल घेऊन मुलाला वर्धा येथून सुखरुप नागपुरात आणले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी हंसराजविरुद्ध कलम ३१७, ३६३, १८२ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.