मित्रानेच केला मित्राचा खून! सहाव्या दिवशी प्रकरण उघडकीस, आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 21:00 IST2022-09-14T20:58:49+5:302022-09-14T21:00:56+5:30
विहिरीच्या काठावर बसलेल्या दोन मित्रांमध्ये झाला वाद

मित्रानेच केला मित्राचा खून! सहाव्या दिवशी प्रकरण उघडकीस, आरोपीला अटक
वरणगाव (जि. जळगाव): विहिरीच्या काठावर बसलेल्या दोन मित्रांमध्ये दारुच्या नशेत वाद झाला. हा वाद एवढा वाढला की एकाने दुसऱ्याला थेट विहिरीत ढकलून दिले. त्यात त्याचा मृत्यू झाला. जाडगाव येथे गुरुवार ८ रोजी घडलेली ही घटना बुधवारी सहाव्या दिवशी उघडकीस आली. या प्रकरणी मित्रास अटक करण्यात आली आहे. गोंविदा संतोष पाटील ( ३५ ) असे मृत तरुणाचे तर राजेंद्र युवराज सोनवणे ( ३२ दोघे रा. जोडगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
गोंविदा आणि राजेंद्र हे दोघे मित्र कित्येक दिवसापासून सोबत राहून काम करीत होते. सोमवार रोजी दुपारच्या वेळेस दोघे मित्र दारू नशेत गावातील पंचायती विहिरीच्या काठावर गप्पा करीत होते. गप्पांमध्येच त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. राजूने गोविंदाला चापटा बुक्क्यांनी मारहाण करुन विहिरीत ढकलून दिले. याबाबत सुरूवातीला गोविंदाचे वडील संतोष जगदेव पाटील यांच्या खबरीवरून वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. वरणगांव पोलिसांनी या घटनेचा तपास करून हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. संतोष पाटील यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र सोनवणे याच्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे .पुढील तपास सपोनि आशिष अडसूळ हे करीत आहेत.