राजस्थानमध्ये घरातच लपून बसला होता फरार सुवर्णकार, गुंतवणूकदारांचे लाखोंचे दागिने, भिशीचे पैसे लाटले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 12:52 PM2023-05-20T12:52:29+5:302023-05-20T12:53:19+5:30

तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधून काढत त्याला घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

A fugitive goldsmith was hiding in a house in Rajasthan, jewels worth millions of investors, Bhisi's money were stolen | राजस्थानमध्ये घरातच लपून बसला होता फरार सुवर्णकार, गुंतवणूकदारांचे लाखोंचे दागिने, भिशीचे पैसे लाटले

राजस्थानमध्ये घरातच लपून बसला होता फरार सुवर्णकार, गुंतवणूकदारांचे लाखोंचे दागिने, भिशीचे पैसे लाटले

googlenewsNext

डोंबिवली : सर्वसामान्य नागरिकांकडून भिशीच्या नावाने पैसे, गहाण ठेवलेले व बनविण्यासाठी दिलेले दागिने घेऊन पसार झालेल्या सोहनसिंह चैनसिंह दसाना (५२) या भामट्या सुवर्णकाराला रामनगर पोलिसांनीराजस्थान येथून अटक केली. गेल्या सहा महिन्यांपासून सोहनसिंह आपल्या घरातील एका रूममध्ये बाहेरून कुलूप लावून लपून राहत होता. तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधून काढत त्याला घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

ठाकुर्ली रेल्वे स्टेशनसमोर सोहनसिंहचे महालक्ष्मी ज्वेलर्स दुकान होते. नागरिकांकडून विश्वासाने दागिने घेऊन त्या मोबदल्यात कर्ज देतो सांगत, तसेच दागिने बनविण्यासाठी आगाऊ रकमा घेऊन, कोणतेही दागिने बनवून न देता तसेच दागिने व रक्कम घेऊन सहा महिन्यांपूर्वी सोहनसिंह पसार झाला होता. त्याने भिशीच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून पैसे घेतले होते. अचानक त्याच्या दुकानाला कुलूप लागल्याने जेव्हा गुंतवणूकदारांनी सोहनसिंहला फोन करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याचा फाेन सातत्याने बंद असल्याचे आढळून आले. चौकशीअंती आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित १६ गुंतवणूकदारांनी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेत सोहनसिंह विरोधात तक्रार दिली होती. गुंतवणूकदारांची एकूण ३१ लाख ५३ हजार २२० (रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने) फसवणूक झाली होती. 

पत्नीने दिली खोटी माहिती
- पोलिसांचे पथक तांत्रिक तपासाच्या आधारे राजस्थान येथील थुरावड बरकडा की भागल या गावात पोहोचले. सोहनसिंहच्या घराचा ठावठिकाणा शोधत पोलिस त्याच्या घरी पोहोचले. पण सहा महिन्यांपासून ते आमच्या संपर्कात नाहीत, अशी खोटी माहिती सोहनसिंहच्या पत्नीने पोलिसांना दिली. 

- सोहनसिंह हा घरातच असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. तो घरातील एका खोलीला बाहेरून कुलूप लावून आतमध्ये लपून राहतो, असेही समजले होते. अखेर पोलिसांनी घरात घुसून कुलूप तोडून त्याला ताब्यात घेतले.
 
- या गुन्ह्याच्या तपासात सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर आणि पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगेश सानप, पोलिस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, नितीन सांगळे, नीलेश पाटील, निसार पिंजारी यांचे पथक नेमले होते.


 

Web Title: A fugitive goldsmith was hiding in a house in Rajasthan, jewels worth millions of investors, Bhisi's money were stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.