एक चिता अन् 7 मृतदेह! पत्नीच्या व्यभिचारानं पूर्णपणे उध्वस्त झालं हसतं-खेळतं कुटुंब, कॉल रेकॉडिंग बनले 'अणुबॉम्ब'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 12:16 PM2023-03-03T12:16:20+5:302023-03-03T12:21:04+5:30
एका दाम्पत्याने 5 मुलांसह नर्मदेच्या कालव्यात उडी घेऊन जीवन यात्रा संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे....
सांचोर (जालोर) -राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात असलेल्या सांचोर येथे एका दाम्पत्याने 5 मुलांसह नर्मदेच्या कालव्यात उडी घेऊन जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेत सातही जणांचा मृत्यू झाला. ही माहिती संपूर्ण परिसरात वाऱ्याप्रमाणे पसरली. एकाच वेळी 7 जणांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. एवढेच नाही, तर पोलिस-प्रशासनही हादरले. खरे तर, आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करणार्या व्यक्तीने एवढे भयंकर पाऊल कसे उचलले हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र आता या प्रकरणाचा उलगडा होऊ लागला आहे. या भीषण घटनेमागील धक्कादायक कहाणी आता समोर आली आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.
ही खळबळजनक घटना 1 मार्च 2023 रोजी घडली. याच दिवशी शंकर राम उर्फ शंकरा कोळी याचे पत्नी बादली सोबत भांडणही झाले होते. या दाम्पत्याला तीन मुली आणि दोन मुलं अशी 5 अपत्य होती. शंकर पत्नी बादली आणि मुलांसह सिद्धेश्वरला गेला होता. यानंतर शंकरने कुटुंबासह नर्मदेच्या कालव्यात उडी घेतल्याची बातमी येऊन धडकली. घाई गडबडीत ही माहिती पोलिसांनाही देण्यात आली. घटनेची माहिती मुळताच जिल्हाधिकारी-एसपी पथकासह घटनास्थळी पोहोचले. यानंतर गोताखोरांनी एक-एक करून 7 ही मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी मृताच्या भावाने शेजारीच राहणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे.
पत्नीचे परपुरुषाशी संबंध? -
मिळालेल्या माहितीनुसार, शंकरची पत्नी बादली शेजारीच राहणाऱ्या एका तरुणासोबत मोबाईलवर बोलत असल्याचा संशय शंकरला आला होता. यामुळे त्याने एक दिवस चोरून तिच्या मोबाईलचे रेकॉर्डिंग अॅक्टिव्ह मोडवर केले. यानंतर जेव्हा शंकरने संपूर्ण रेकॉर्डिंग ऐकले तेव्हा संपूर्ण सत्य समोर आले. यासंदर्भात शंकरने पत्नीलाही समजावून सांगितले होते. एवढेच नाही, तर हे प्रकरण वाढल्यानंतर सामाजिक पातळीवरही तिला समजावून सांगण्यात आले. यानंतरही शंकरच्या पत्नीने संबंधित तरुणाशी बोलणे सुरूच होते. यासंदर्भात एकदा पंचायतही झाली, यात संबंधित तरूण भविष्यात असे करणार नाही, असे ठरले. मात्र या सर्व गोष्टींचा काहीही उपयोग झाला नाही.
महिलेच्या प्रियकराचा उद्धटपणा -
पंचायत आणि सामाजिक पातळीवर समजावल्यानंतरही महिलेच्या प्रियकराने शंकरला फोन करून धमकी दिल्याचा आरोपही आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, आरोपी तरुण शंकरला म्हणाला, पंचायत करून काय मिळवले. यानंतर शंकरच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. शंकरने 1 मार्च रोजी पत्नी आणि मुलांसह नर्मदेच्या कालव्यात उडी घेतली. या घटनेत सर्वांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे पत्नीच्या व्यभिचारामुळे हसते खेळते कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.