बनावट नोटा चलनात आणणारी पश्चिम बंगालमधील टोळी जेरबंद!
By नरेश डोंगरे | Published: May 14, 2024 11:50 PM2024-05-14T23:50:54+5:302024-05-14T23:51:07+5:30
पाच बंगालमधील तर दोघे पुण्यातील : रेल्वे पोलिसांनी लावला छडा
नागपूर : रेल्वे स्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी पाचशेंच्या नकली नोकटा चलणात आणून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा छडा लावून त्यांच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी रेल्वे पोलिसांनी बजावली आहे. लखफर अखलू मंडल (वय ४२), मामून लखपर मंडल (वय १९), इंद्रजित रामचरण मंडल (वय ३३), संतोष पांचू मंडल (वय ३२, सर्व रा. मुर्शिदाबाद जिल्हा, प. बंगाल) आणि यमुनाकुमार वामननाथ प्रसाद (३५, रा. मोरया कॉलनी, गणपती मंदिराजवळ मावळ, पुणे), किशोर रघुनाथ शिंदे (वय ३२, रा. चाकण पुणे) आणि शशिकला उर्फ सानिका प्रकाश दाैडकर (वय ४२, रा.विशालगड चाकण, पुणे) अशी या टोळीतील आरोपींची नावे आहेत.
विशेष म्हणजे, ३ एप्रिलला सकाळी या टोळीतील लखफर मंडल या आरोपीने नागपूर स्थानकावर तिवारी नामक वेंडरकडून जेवणाची थाळी विकत घेतली होती. ५०० ची नोट देऊन त्याने साडेचारशे रुपये परत घेतले अन् घाईगडबडीत निघून गेला. त्यामुळे तिवारीला संशय आला अन् त्याने ती नोट तपासली असता ती नकली असल्याची शंका त्याला आली. त्याने हा प्रकार रेल्वे पोलिसांना सांगितला. त्यामुळे शोधाशोध करून आरोपी लखफर मंडलला पकडण्यात आले. त्याच्या तपासातून पुण्यात त्याचे साथीदार अशा प्रकारे नकली नोटा चालविण्याचे रॅकेट चालवित असल्याचे पुढे आले. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी गेल्या दीड महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी धडक देत उपरोक्त आरोपींना अटक केली.
दीड महिन्यांच्या परिश्रमाला यश
या गुन्ह्याची उकल करण्यासाठी रेल्वेचे पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पांडूरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार मनीषा काशिद यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक निलम डोंगरे, हवलदार संजय पटले, पुष्पराज मिश्रा, सतश बुरडे, प्रवीण खवसे, अमोल हिंगवे, मजहर अली, रोशन मोंगरे , समीर खाडे, बबलू वरठी, विशाल मिश्रा, रोशना डोये आदींनी तब्बल दीड महिना परिश्रम घेतले आणि अखेर या टोळीला अटक करण्यात यश मिळवले.