मैत्री तोडल्याच्या कारणाने तरुणाच्या घरावर गुंड टोळीचा हल्ला, खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा
By जितेंद्र कालेकर | Published: October 12, 2023 08:11 PM2023-10-12T20:11:26+5:302023-10-12T20:11:38+5:30
हल्ल्यानंतर या टोळक्याने परिसरातील १५ ते १६ वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसानही केले.
ठाणे: हाणामारी तसेच इतरही दहशत माजविण्याच्या गुन्हयांमध्ये आधी एकत्र असलेल्या प्रेम घाडगे (२१, रा. रौनकपार्क, कोकणीपाडा, ठाणे) याने मैत्री तोडल्याच्या रागातून गुंड टोळीतील त्याचा मित्र गौरव मिसाळ उर्फ कोयता (२२, रा. कोकणीपाडा, ठाणे) आणि शिवा उर्फ बादल (रा. गावंडबाग, ठाणे) या दोघांसह पाच ते सात जणांच्या टोळक्याने तलवार, कुऱ्याड आणि चॉपर अशा हत्यारांनी खूनी हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडला. याप्रकरणी गौरव याच्यासह सहा ते सात जणांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली. हल्ल्यानंतर या टोळक्याने परिसरातील १५ ते १६ वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसानही केले.
कोकणीपाडयात गौरव उर्फ कोयता याच्या टोळीमध्येच पूर्वी प्रेम घाडगे हाही हाणामाऱ्यांसारखे गुन्हे करीत होता. परंतू, गौरवमुळे आपला मुलगा प्रेम बिघडत चालल्याचे घाडगे कुटूंबीयांच्या लक्षात आले. याच कारणाने त्यांनी त्याला गौरवसोबत न राहण्याची तंबी दिली. त्यामुळे प्रेमने गौरवसोबत राहणे गेल्या काही दिवसांपासून सोडले होते. प्रेम पूर्वीप्रमाणे आपल्यासोबत राहत नसल्याच्या रागातून १२ ऑक्टाेंबर रोजी पहाटे २.३० ते ३ वाजण्याच्या दरम्यान गौरवने त्याच्या साथीदारांसह कोकणीपाडयातील प्रेमच्या घरावर हल्ला केला. त्याच्या टोळीने हातात कुऱ्हाड, तलवार, चाकू अशी शस्त्रसामुग्री घेउन घाडगे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत शिरकाव केला. त्यानंतर गौरवने कुऱ्हाडीने प्रेम याच्यावर खूनी हल्ल्यासाठी त्याच्या डोक्याच्या दिशेने कुऱ्हाड फेकली.
यात प्रेम बाजूला झाल्याने ती भिंतीवर लागली. तसेच फरशीचे तुकडे आणि चॉपर भिरकावून प्रेमच्या आई रेखा घाडगे (३५) यांना दुखापत केली. तसेच परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी तेथील रहिवाशांनाही मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर स्थानिक रहिवाशांनी रस्त्यावर उभ्या केलेल्या मोटारसायकलींसह सुमारे १६ वाहनांची तोडफोड करुन दहशत निर्माण केली. या सर्व प्रकाराने कोकणीपाडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ठाण्याचे सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्यासह सहायक पोलिस आयुक्त अनिल देशमुख आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त अनिल देशमुख यांनी ‘लोकमत’ ला दिली.