राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या सात जणांच्या टोळीला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 06:55 PM2022-08-29T18:55:05+5:302022-08-29T18:56:16+5:30
शिताफीने पकडण्यात गुन्हे शाखा तीनच्या पोलिसांना यश
नालासोपारा (मंगेश कराळे) :- एका कंपनीतील सुरक्षा रक्षकाला मारहाण करून हातपाय बांधून ठेवत शनिवारी दरोडा टाकणाऱ्या सात जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी ३६ तासांच्या आत पकडण्यात यश मिळाले आहे. यांचे अजून कोणी साथीदार आहेत का ? याआधी कुठे असे दरोडे टाकलेले गुन्हे दाखल आहेत का ? याचा पोलीस शोध घेत तपास करत आहे.
वसई फाट्याच्या परमार इंडस्ट्रीयल इस्टेटमधील लिनीट एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत शनिवारी दुपारी दरोडा पडला होता. कंपनीत आठ दरोडेखोर येऊन सुरक्षा रक्षकाला मारहाण करून जबरदस्तीने हात पाय बांधून ठेवून आयशर टेंपो आणून गोडाऊनमध्ये ठेवलेले ३ लाख ७८ हजारांचे दीड टन स्टेनलेस स्टीलचे रॉड जबरी भरून व सुरक्षा रक्षकाचा ५ हजारांचा मोबाईल चोरी करून निघून गेले होते. याप्रकरणी मनोज राणे (४०) यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. राष्ट्रीय महामार्गावर घडणाऱ्या गुन्हयांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेवुन सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन पायबंद करण्याच्या सुचना दिल्या होत्या. गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलीस पथकाने वेगवेगळे पथक तयार करुन गुन्हयातील आरोपीत यांचा तांत्रीक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने माहिती प्राप्त करुन गुन्हा घडल्याच्या 36 तासाच्या आत सापळा रचुन आरोपी बद्रीआलम खान (३६), ईरशाद अली (५४), मोहम्मद रफिक शहा (२७), मोहम्मद तोफीक शेख (३७), मजहर खान (२१), नजिर शेख (४०) आणि हाफिजउल्ला खान (२९) यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे प्राथमिक तपास केल्यावर सदर गुन्हयात आरोपींचा सक्रीय सहभाग निष्पन्न झाला आहे. पकडलेल्या सात आरोपीपैकी बद्रीआलम खान याच्यावर यापुर्वी नाशिक व ठाणे जिल्ह्यात अशाच प्रकारे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तपास सुरू आहे -
आरोपीत यांनी अशाच प्रकारे आणखी गुन्हे केले आहेत, अगर कसे ? याबाबत अधिक तपास सुरु आहे. नमुद आरोपीत यांना पुढील कारवाई करीता पेल्हार पोलिसांकडे ताबा देण्यात आला आहे. - प्रमोद बडाख (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट तीन)