देशभरात भटकंती करून लॅपटॉप चोरायचे, टोळीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 12:09 PM2024-01-17T12:09:23+5:302024-01-17T12:09:43+5:30
अटक केलेले तिघेही तामिळनाडूचे असून भारतभर भटकत ते लॅपटॉप चोरी करायचे. त्यांच्याकडून ९ लॅपटॉप जप्त करून सहा गुन्ह्यांची उकल झाली असल्याचे पोलिसांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.
नवी मुंबई : कारची काच फोडून लॅपटॉप चोरी करणाऱ्या तिघांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे. दोन कारच्या काचा फोडून त्यामधील लॅपटॉप चोरून ते पसार होत असतानाच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. अटक केलेले तिघेही तामिळनाडूचे असून भारतभर भटकत ते लॅपटॉप चोरी करायचे. त्यांच्याकडून ९ लॅपटॉप जप्त करून सहा गुन्ह्यांची उकल झाली असल्याचे पोलिसांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.
वाशी रेल्वेस्थानक परिसरातील दोन कारच्या काचा फोडून त्यामधील लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना घडली होती. या दोन्ही लॅपटॉपचे लोकेशन ऑन असल्याने लॅपटॉप मालक अमेय विचारे व अभिषेक बैरवान यांना मोबाइलवर त्याची माहिती मिळत होती. त्यांनी वाशी पोलिसांकडे लॅपटॉप चोरीची तक्रार केली होती.
लोकशनमुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या पथकाला चोरीला गेलेले लॅपटॉप हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात दिसून आले. यामुळे वाशी पोलिसांनी रेल्वे पोलिसांची मदत घेऊन तिघा संशयितांची झडती घेतली त्यामध्ये ९ लॅपटॉप आढळून आले.
तामिळनाडूचे राहणारे, साथीदारांचा शोध सुरू
पोलिसांनी सेनिथील दूरायरजन कुमार आर. डी. (४८), मूर्ती रामासामी चिन्नाप्पन (३०) व शिवा विश्वनाथन (४७) यांना अटक केली. आता पोलिस त्यांच्या इतरही साथीदारांचा शोध घेत आहेत. सर्वजण तामिळनाडूचे राहणारे असून भारतभर ते भटकंती करून लॅपटॉप चोरी करत होते.
लॅपटॉपचे लोकेशन मिळाल्याने लागले हाती
मागील २० दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी भटकंती करत लॅपटॉप चोरी करत होते. त्यांच्याकडून वाशी, नवघर, मुलुंड, सीबीडी, नाशिक, पुणे तसेच पंढरपूर येथील गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारची काच फोडून त्यामधील लॅपटॉप चोरी करत होते. वाशीत त्यांनी एकाच वेळी दोन कारमधील लॅपटॉप चोरले होते. मात्र लॅपटॉपचे लोकेशन मोबाइलवर मिळत असल्याने ते पोलिसांच्या हाती लागले.