सांगलीत चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 10:47 PM2023-03-23T22:47:21+5:302023-03-23T22:47:31+5:30
संशयितावर गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, शरद जाधव, सांगली: व्हॉट्सॲपवर केलेल्या चॅटिंगचे स्क्रीन शॉट्स व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार सांगलीत घडला. या प्रकरणी पीडितेने सूरज पाटील (रा. सांगली) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बाहेरच्या जिल्ह्यातील असलेली पीडिता मैत्रिणीसोबत शहरातील एका उपनगरात राहण्यास आहे. ती एका फायनान्स कंपनीत काम करते. काही दिवसांपूर्वी संशयित सूरज पाटील हा व्यावसायिक कर्ज घेण्यासाठी त्या कंपनीत गेला होता. यावेळी त्याची तरुणीशी ओळख झाली होती. यानंतर काही दिवसांनी त्याने पीडितेस ‘तुझा व्हॉट्सॲप मी हॅक केले असून, तू कोणाशी चॅट करते व काय चॅटिंग करते हे मला माहीत आहे म्हणून तिला मारहाण केली व दुचाकीवरून बुधगाव येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केले.
यानंतर याच लॉजवर वेळोवेळी नेत त्याने पीडितेच्या इच्छेविरोधात शरीरसंंबंध ठेवले. यास तिने प्रतिकार केला असता, तुझे चॅटिंगचे स्क्रीन शॉट व्हायरल करण्याची धमकी संशयिताने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयित सूरज पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.