सोन्याचं डोरले महिलेला आवडले; पुण्याच्या सराफाला 'हनीट्रॅप'मध्ये अडकवत २७ लाख लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 16:18 IST2025-04-08T16:17:16+5:302025-04-08T16:18:10+5:30
२०१३ मध्ये सराफा व्यापारी पुण्याहून नगरमार्गे गावी निघाले होते. तेव्हा महिलेचा फोन आला, तिने आपले घर रस्त्यातच आहे तुम्ही घरी या असा आग्रह धरला

सोन्याचं डोरले महिलेला आवडले; पुण्याच्या सराफाला 'हनीट्रॅप'मध्ये अडकवत २७ लाख लुटले
अहिल्यानगर - केडगाव येथील ३२ वर्षीय महिलेने पुण्याच्या सराफा व्यापाऱ्याला हनीट्रॅपमध्ये ओढून बदनामी करण्याची धमकी देत वेळोवेळी २७ लाखांना लुबाडले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०१२ पासून सुरू होता. बदनामीच्या भीतीने व्यापाऱ्याने स्वत: पुण्यातील घर विकून महिलेला पैसे दिले, तिच्या घराच्या कर्जाचेही हफ्ते भरल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
केडगाव येथील महिलेची एक बहीण पुण्यात राहते. ती या सराफा व्यापाऱ्याच्या दुकानातून सोने खरेदी करायची. पुण्यातील बहिणीने खरेदी केलेले अक्कासाहेब डोरले केडगावच्या बहिणीलाही आवडले. तिने बहिणीकडून पुण्यातील सराफाचा फोन नंबर मिळवला. ताईसारखे डोरले मला बनावयचे आहे असं फोन करून तिने व्यापाऱ्याला सांगितले. तो तिला ओळखत होता. तू पैसे घेऊन दुकानात ये, तुला डोरले बनवून देतो असं सराफाने सांगितले पण महिला पैसे घेऊन दुकानात गेली नाही. तेव्हापासून महिला सतत व्यापाऱ्याला व्हिडिओ कॉल, फोन कॉल करायची. २०१३ मध्ये सराफा व्यापारी पुण्याहून नगरमार्गे गावी निघाले होते. तेव्हा महिलेचा फोन आला, तिने आपले घर रस्त्यातच आहे तुम्ही घरी या असा आग्रह धरला. तिच्या आग्रहाखातर व्यापारी महिलेच्या घरी गेले. त्यामुळे दोघांमध्ये जवळीक आणखी वाढली.
एक दिवस महिलेने व्यापाऱ्याला फोन करून पुण्यातील तिच्या बहिणीच्या घरी बोलावले. काही महत्त्वाचे काम असल्याचा बहाणा केला. त्यावेळी खूप पाऊस पडत असल्याने ते तिथेच मुक्कामी थांबले. त्या रात्री महिलेने व्यापाऱ्याला प्रेमाची गळ घातली. मासा जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच महिलेने तिचे खरे रूप दाखवले. तिने आपल्या प्रेमसंबंधाचे काही फोटो आहेत. ते तुझ्या नातेवाईकांना दाखवून तुझी बदनामी करेन, तसे करायचे नसेल तर मला ब्युटी पार्लर टाकण्यासाठी १ लाख रुपये द्यावी लागतील अशी धमकी दिली. बदनामीच्या भीतीने व्यापाऱ्याने ऑनलाईन व रोख स्वरुपात तिला १ लाख रुपये दिले.
महिलेच्या अपेक्षा वाढतच गेल्या...
महिलेच्या अपेक्षा वाढतच गेल्या. नगरमध्ये घर घ्यायचे आहे त्यासाठी पैसे हवे आहेत पैसे दिले नाही तर ते व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी महिलेने दिली. पैसे नसल्याने घाबरलेल्या व्यापाऱ्याने घडलेला प्रकार पत्नीला सांगितला. पत्नीनेही बदनामीच्या भीतीने पुण्यातील घर विकून सदर महिलेला पैसे देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सराफाने घर विकून महिलेला १८ लाख दिले. महिलेने या पैशातून ४३ लाखांचे घर घेतले. उर्वरित २३ लाखांचे महिलेने कर्ज घेतले. कर्जाचा प्रतिमहिना २३ हजारांचा हप्ताही व्यापारीच भरत होता. घर घेण्यासाठी व हप्त्यापोटी व्यापाराने महिलेला २७ लाख ५६ हजार रुपये दिले असं फिर्यादीत म्हटलं आहे.