वाहतूक कोंडीत कार अडकली; नवऱ्यानं संधी साधली, बायकोला एकटं सोडून धूम ठोकली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 12:36 PM2023-03-09T12:36:12+5:302023-03-09T12:37:49+5:30
गेल्या २ आठवड्यापासून नवऱ्याचा थांगपत्ता न लागल्याने अखेर ५ मार्चला पोलीस तक्रार करण्यात आली आहे
बंगळुरू - कर्नाटकची राजधानी बंगळुरू इथं वाहतूक कोंडींच्या समस्येने प्रत्येकजण हैराण आहे. परंतु याच वाहतुककोंडीला एका नवरदेवाने संधी बनवली आहे. लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पत्नीला सोडून पती फरार झाला. १६ फेब्रुवारीची ही घटना आहे. या जोडप्याची कार महादेवपुरा येथील टँक कॉरिडोरच्या वाहतूक कोंडीत अडकली होती. तेव्हा हीच संधी साधून नवरदेवाने पळ काढला.
गेल्या २ आठवड्यापासून नवऱ्याचा थांगपत्ता न लागल्याने अखेर ५ मार्चला पोलीस तक्रार करण्यात आली आहे. पोलीस लवकरच पळालेल्या नवऱ्याला शोधून काढतील असा विश्वास कुटुंबाला आणि बायकोला वाटत आहे. चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील चिंतामणी येथील रहिवासी असलेल्या या व्यक्तीचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते त्यामुळे तो नाराज होता. कारण त्याच्या प्रेयसीने कथितपणे खासगी क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्याची धमकी दिली होती.
नवऱ्याच्या २२ वर्षीय पत्नीने एका वृत्तपत्राला सांगितले की, आमच्या लग्नानंतर १५ फेब्रुवारी रोजी पतीने पहिल्यांदा त्याच्या अफेअरबद्दल खुलासा केला. पत्नीच्या म्हणण्यानुसार, त्याला त्याच्या एक्स प्रेयसीकडून ब्लॅकमेल करण्याच्या धमक्या येत होत्या असं पतीने सांगितले. तरीही मी पतीला आश्वासन दिले की, मी आणि आई वडील दोघेही त्याच्या पाठीशी उभे राहतील आणि त्याला काळजी करण्याची गरज नाही.
ट्रॅफिकमध्ये अडकली होती कार
लग्नानंतर दुसऱ्या दिवशी हे जोडपे चर्चमधून परतत होते. तेव्हा त्यांची कार पै लेआऊटजवळ सुमारे १० मिनिटे अडकून पडली. यावेळी कारच्या पुढच्या सीटवर बसलेल्या पतीने दार उघडले आणि वेगाने धावत सुटला. अचानक झालेल्या या घडामोडीने हैराण झालेल्या पत्नीनेही गाडीतून खाली उतरून पतीच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीच्या तावडीत न सापडता पती पळून जाण्यात यशस्वी झाला.
ड्रायव्हरच्या पत्नीशी होते प्रेमसंबंध
पत्नीने सांगितले की, पती कर्नाटक आणि गोव्यात एचआर एजन्सी चालवण्यासाठी वडिलांना मदत करत असे. गोव्यात असताना कंपनीच्या ड्रायव्हरच्या पत्नीशी त्याचे प्रेमसंबंध होते. दोन मुलांची आई असलेली ही महिलाही याच कंपनीत लिपिक म्हणून काम करत होती. एकदा माझ्या सासूला त्यांच्या अफेअरची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने आईला हे नाते संपवण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही तो त्या महिलेला गुपचुप भेटत राहिला. महिलेसोबतचे नाते संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात कुटुंबीयांनी लग्न ठरवले. पत्नी म्हणाली, 'मला लग्नापूर्वीही या अफेअरबद्दल सांगण्यात आले होते, पण मी त्याच्याशी लग्न करण्यास तयार झाले. कारण त्याने महिलेला सोडण्याचे आश्वासन दिले होते.