वकिलाचे घर फोडले, सव्वा तीन लाखांचा ऐवज लांबविले, शिरपुरातील सुभाषनगरातील घटना
By देवेंद्र पाठक | Published: September 22, 2023 04:26 PM2023-09-22T16:26:57+5:302023-09-22T16:27:13+5:30
याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी घरफोडीचा गुन्हा शिरपूर शहर पोलिसात दाखल झाला.
धुळे : शिरपूर येथील सुभाष काॅलनीत वकिलाचे बंद घर फोडून चोरट्याने रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा ३ लाख १० हजाराचा ऐवज लांबविला. ही घटना १८ ते २० सप्टेंबर या कालावधीत घडली. शिंगावे परिवार घरी परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी घरफोडीचा गुन्हा शिरपूर शहर पोलिसात दाखल झाला.
शिरपूर येथील सुभाष कॉलनीत राहणारे ॲड. रणवीर युगराज शिंगावे (हमु. पुणे) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शिंगावे परिवार बाहेरगावी गेल्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. बंद घराचा चोरट्याने फायदा घेतला. कडीकोंडा व कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरात शोधाशोध करत वस्तूंचे नुकसान केले. घरातील बेडरुममधील कपाट फोडून त्यातील लॉकर तोडले.
लॉकरमध्ये ठेवलेले ८० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार, ६० हजार रुपये किमतीची मंगलपोत, ८० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, १० हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख १० हजाराचा ऐवज चोरट्याने शिताफिने लांबविला. चोरीची ही घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात ते २० सप्टेंबर सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडला. शिंगावे परिवार घरी आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने शिरपूर शहर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक संदीप दरवडे घटनेचा तपास करीत आहेत.