नोकरीचे आमिष दाखवून युवतीला लावला पावणेपाच लाखांचा चुना
By सूरज.नाईकपवार | Published: June 15, 2024 12:44 PM2024-06-15T12:44:24+5:302024-06-15T12:44:47+5:30
फ्रान्सिस बार्रेटो, अनिता बार्रेटो व पीटर फर्नांडीस अशी या संशयितांची नावे आहेत.
मडगाव : नोकरी देण्याच्या बहाण्याने एक युवतीकडून पावणे पाच लाखांची रक्कम उकाळण्याची घटना गोव्यात घडली असून, या प्रकरणी सासष्टी तालुक्यातील फातोर्डा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार नोंद झाली आहे. फ्रान्सिस बार्रेटो, अनिता बार्रेटो व पीटर फर्नांडीस अशी या संशयितांची नावे आहेत.
भादंसंच्या ४२० व ४६५ कलमाखाली त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रियंका नाईक पुढील तपास करीत आहेत. मुरिडा फातोर्डा येथील दीपाली सिरसाट या तक्रारदार आहेत. २२ डिसेंबर २०२२ साली वरील घटना घडली होती. एकूण ४ लाख ७४ हजारांचा सौदा ठरला होता.
त्यानुसार, तक्रारदाराने बँकेतून ३ लाख ७४ हजार व रोख १ लाख रुपये संशयिताने दिले. नंतर फ्रान्सिस यांनी बोगस तात्पुरत्या कामाचे फॉर्म तक्रारदाराला दिले होते. प्रत्यक्षात आपल्याला कामही मिळाले नाही व संशयितांनी घेतलेली रक्कमही मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाली आहे. असे दीपाली यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.