प्रेमाचा रक्तरंजित शेवट! लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीला संपवलं, त्यानंतर प्रियकराने...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 08:17 PM2024-08-14T20:17:34+5:302024-08-14T20:18:42+5:30
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसीची केली हत्या, अटकेच्या भीतीने त्याने नदीत उडी मारून दिला जीव
छत्तीसगड येथे प्रेमी युगलाच्या हत्येची घटना समोर आली आहे जी ऐकून पोलीसही हैराण झालेत. एक प्रियकर गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या प्रेयसीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्यानंतर अचानक त्याने प्रेयसीचा गळा दाबून खून केला. या हत्येनंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जवळपास २३१ किमी अंतर गाठले. ही कहाणी इथेच संपत नाही तर हत्येनंतर आरोपी प्रियकरानेही एका नदीत उडी मारून आत्महत्या केली.
प्रेमाचा रक्तरंजित शेवट
खून एकीकडे आणि मृतदेह दुसरीकडे असाच हा प्रकार होता. ३८ वर्षीय सरकारी महिला शिक्षिकेची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह २३१ किमी दूर सापडला. तिचा खून अन्य कुणी केला नसून तिच्याच ४३ वर्षीय प्रियकराने केल्याचं उघड झालं. प्रेयसीच्या हत्येनंतर प्रियकरानेही मृत्यूला कवटाळलं. ८ ऑगस्टला हा सर्व प्रकार घडला.
आईने केली होती तक्रार
त्याचदिवशी कबीरधाम जिल्ह्यातील दशरंगपूर पोलीस ठाण्यात सावित्री विश्वकर्मा या तक्रार नोंदवण्यासाठी पोहचल्या. तिथे मुलगी सपना विश्वकर्मा २७ जुलैपासून बेपत्ता आहे. तिचा काही ठावठिकाणा नाही. ती बाघामुडा येथील सरकारी शाळेत शिक्षिका होती अशी तक्रार दिली. त्या तक्रारीनंतर पोलिसांनी गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली.
मोबाईलनं उघडलं रहस्य
पोलिसांच्या तपासात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सपनाच्या मोबाईलचं लोकेशन, कॉल डिटेल्स तपासले गेले. ज्यात सपना १ ऑगस्टपर्यंत बेमेतरा जिल्ह्यातील लोलेसरा येथे राहत असल्याचं पुढे आले. पोलिसांनी लोकेशन ट्रेस करत तिथे पोहचले तेव्हा ते घर रघुनाथ साहू यांच्या नावे होते. घरमालक रघुनाथ यांनी ४३ वर्षीय आशिष उपाध्यय यांना घर भाड्याने दिल्याचं सांगितले. आशिषसोबत सपना लिव्ह इनमध्ये राहत होती. या दोघांमध्ये सतत वाद व्हायचे असं शेजाऱ्यांकडून पोलिसांना कळाले.
आशिषनं घरमालकाला सांगितलं सत्य
घरमालक रघुनाथ याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, २ ऑगस्टच्या सकाळी ३ वाजता आशिष उपाध्ययने त्यांना फोन केला होता. घरमालक तिथेच काही अंतरावर राहत होता. आशिषने रघुनाथ यांना घरी बोलावले. त्याठिकाणी पोहचले तेव्हा आशिषनं सपनाची गळा दाबून हत्या केली होती. मृतदेह लपवण्यासाठी आरोपीनं घरमालकाची मदत मागितली. आपणही यात अडकू या भीतीने घरमालकाने त्याला मदत केली. त्यानंतर एका वाहनाने या दोघांनी मृतदेह आशिषच्या वडिलांच्या गावी आणला. त्याठिकाणी वाटेत एका दरीत मृतदेह फेकून दिला आणि दोघेही तिथून निघाले.
नदीत सापडला आशिषचा मृतदेह
यातच रविवारी बेमेतरामध्ये नदीत एकाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली तर तो सपनाचा प्रियकर आशिषचा असल्याची ओळख पटली. अटकेच्या भीतीने आशिषने नदीत उडी मारून जीव दिल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या पोलिसांनी सपनाचा मृतदेह शोधून ताब्यात घेतला आहे. त्यासोबत गुन्ह्यातील वाहन जप्त केले आहे. घरमालक रघुनाथ साहूवर या प्रकरणी मदत केल्याचा आरोप ठेवत अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.