केळवडे येथील एकजण जंगलात गंभीर जखमी अवस्थेत सापडला; घातपाताच्या शक्यतेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 09:36 PM2022-02-04T21:36:12+5:302022-02-04T21:37:00+5:30
यात घातपाताची शक्यता व्यक्त होत असून याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस तपास सुरू होता.
राजापूर: राजापूर तालुक्यातील केळवडे येथील दिपक उर्फ बाबू गुरव हे शुक्रवारी सकाळी जंगलात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्याला बंदुकीच्या गोळ्या लागल्यानेच ते गंभीर जखमी झाल्याची चर्चा गावात सुरू आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यात घातपाताची शक्यता व्यक्त होत असून याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस तपास सुरू होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार केळवडे येथील दीपक राजाराम गुरव (४५) हे शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे गुरे घेऊन बागेत चरायला सोडण्यासाठी गेले होते. त्यानंतर काही वेळाने शेतात कामासाठी जाणाऱ्या महिलांना ते जंगलात रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेले निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ वाडीतील ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी राजापूर येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कणकवली येथे हलविण्यात आले.
दरम्यान त्यांच्या डोक्याला बंदुकीच्या गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाल्याची चर्चा आता गावात सुरू आहे. या घटनेनंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी राजापूर पोलिसांना संपर्क साधत या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर आपल्या टिमसह केळवडे गावात तपासासाठी दाखल झाले असून सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस तपास सुरू होता. त्यामुळे या घटनेबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हा घातपाताचा प्रकार असल्याची कुजबुज सुरु झाली आहे.