वडिलांची हत्या, आईचा गळा दाबला, पत्नीला दिलं विष, मग...: फॅमिली मर्डरमध्ये नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 11:11 IST2024-12-10T11:09:27+5:302024-12-10T11:11:11+5:30
या घटनेत १३ वर्षीय मुलगा बेशुद्ध अवस्थेत सापडला त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

वडिलांची हत्या, आईचा गळा दाबला, पत्नीला दिलं विष, मग...: फॅमिली मर्डरमध्ये नवा ट्विस्ट
कुरुक्षेत्र - हरियाणातील कुरुक्षेत्र इथं काही दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील चौघांचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती. या ४ जणांची कुणीतरी हत्या केल्याचा संशय होता परंतु पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ४० वर्षीय आरोपीने आधी वडिलांची गळा चिरून हत्या केली, मग आईचा गळा दाबला, पत्नीला विष प्यायला दिले आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. या आरोपीने त्याच्या मुलावरही हल्ला केला होता परंतु तो थोडक्यात बचावला.
याबाबत पोलीस अधीक्षक वरूण सिंगला म्हणाले की, मृत दुष्यंत सिंहने लिहिलेली कथित सुसाईड नोट तपासात सापडली. त्यात ३ लोकांच्या हत्येनंतर त्याने आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे. पोलीस या सर्व अँगलने आता तपास करत आहे. दुष्यंत हा आर्थिक संकटात सापडला होता. दुष्यंतने त्याची पत्नी अमनदीप कौरला विष दिले. वडील नायब सिंह यांची गळा कापून हत्या केली. त्यानंतर आई अमृत कौरचा गळा दाबला. स्वत: विष पिऊन आत्महत्या करण्याआधी दुष्यंतने त्याचा १३ वर्षीय मुलगा केशव सिंह याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.
या घटनेत १३ वर्षीय मुलगा बेशुद्ध अवस्थेत सापडला त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. जेव्हा नायब सिंह यांचा एक नातेवाईक रविवारी सकाळी त्यांच्या घरी गेला होता तेव्हा घरचा दरवाजा आतून बंद होता. अनेकदा बेल वाजवूनही काही प्रतिक्रिया आली नाही. शेवटी त्याने दरवाजा तोडला त्यानंतर समोर जे दृश्य पाहिले त्याने तो घाबरला. या नातेवाईकाने पोलिसांना फोन करून माहिती दिली. घरात नायब सिंह, अमृत कौर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तर दुष्यंत सिंह, त्याची पत्नी आणि मुलगा गंभीर अवस्थेत पडले होते. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले तिथे दुष्यंत आणि त्यांच्या पत्नीला मृत घोषित करण्यात आले.
दरम्यान, स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मृतकाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीत त्यांचा एक नातेवाईक विक्रम कॅनडात राहतो, दुष्यंतने त्याला भेटून काही लोकांना परदेशात पाठवण्यासाठी लाखो रुपये घेतले होते. अनेक प्रयत्नानंतरही युवकांना परदेशात पाठवू शकला नाही. विक्रमने दुष्यंतकडून पैसे घेतले होते परंतु काम करत नव्हता त्यामुळे ज्या युवकांनी दुष्यंतला पैसे दिले ते त्यांनी पैसे परत देण्यासाठी तगादा लावला होता.