गोव्यात सारझोरा येथे शेतात मूळ झारखंड येथील एकजण मृतावस्थेत सापडला...
By सूरज.नाईकपवार | Published: March 25, 2024 01:47 PM2024-03-25T13:47:20+5:302024-03-25T13:47:42+5:30
इस्मायल पूर्ती (३१) असे नाव असून तो गोव्यात मासेमारी ट्रॉलर्सवर कामाला होता.
सूरज नाईकपवार, लोकमत न्युजनेटवर्क, मडगाव: गोव्यातील कुंकळ्ळी येथील सारझोरा येथे शेतात मूळ झारखंड राज्यातील एका इसमाचा मृतदेह सापडला. सुरुवातीला मयताची ओळख पटली नव्हती, नंतर पोलिसांनी शोध घेतला असता मयताची ओळख पटली. त्याचे नाव इस्मायल पुर्ती (३१) असे आहे. गोव्यात तो मासेमारी ट्रॉलर्सवर कामाला होता.
अनैसर्गिक मृत्यू म्हणून कुंकळ्ळी पोलिसांनी वरील घटना नोंदवून घेतली आहे. रविवारी मयत शेतात मृतावस्थेत सापडला. रेल्वे रुळाजवळून जात असताना अचानक तो शेतात कोसळला व नंतर त्याला मृत्यू आला अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेवी माहिती मिळाल्यानंतर कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी जाउन पहाणी करुन पंचनामा केला. मयताबद्दल माहितीही गोळा केली. त्याच्या कुटुंबियांनाही झालेल्या घटनेची माहिती देण्यात आली आहे. मृतदेह पुढील वैद्यकीय सोपास्कारासाठी येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक टी. नाईक पुढील तपास करीत आहेत.