‘त्या’ दहशतवाद्यांशी संबंधित मॅकेनिकल इंजिनिअरला रत्नागिरीत बेड्या, आतापर्यंत चौघांना अटक
By विवेक भुसे | Published: July 29, 2023 10:28 PM2023-07-29T22:28:17+5:302023-07-29T22:28:27+5:30
टेरर फंडीग करत असल्याचे चौकशीतून उघड, रतलाम मॉडेलशी संबध
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: कोथरूडमध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याच्या साथीदारास राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आणखी एकाला रत्नागिरी परिसरातून अटक केली. शिनाब नसरुद्दीन काझी (वय २७, रा. काेंढवा, मुळ रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी एटीएसने अटक केलेल्यांची संख्या चार झाली आहे. या सर्वांना न्यायालयाने ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
काझी हा एका आय टी कंपनीमध्ये मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून नोकरी करतो. त्याला तब्बल १५ लाख रुपयांचे पॅकेज आहे. असे असतानाही तो या रतलाम मॉडेलमध्ये सक्रीय असल्याचे दिसून आले आहे. तो पुण्यात अब्दुल कादिर दस्तगीर पठाण याच्या संपर्कात आला असल्याचे एटीएसचे म्हणणे आहे. त्याने इम्रान खान व युनूस साकी यांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी आर्थिक मदत केली असल्याचे समोर आले आहे.
कोथरुड पोलिसांनी मोहम्मद इम्रान युनूस खान आणि युनूस याकूब साकी ( दोघे रा. रतलाम , मध्यप्रदेश, सध्या रा. कोंढवा) या दोघांना पकडले. प्राथमिक तपासामध्ये हे दोघे फरारी दहशतवादी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे या दोघांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून मूळच्या गोंदियामधील आणि सध्या कोंढवा परिसरात वास्तव्याला असलेल्या अब्दुल कादिर दस्तगीर पठाण याला पोलिसांनी अटक केली होती. या तिघांची एकत्रित चौकशी सुरू आहे. तपासामध्ये रत्नागिरीतील काझी याने आर्थिक रसद पुरवल्याची माहिती पुढे आली. त्याला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले होते. चौकशीत त्याने आर्थिक रसद पुरवली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली.
शिनाब काजी याला आज शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. दहशतवादी कृत्य करण्यासाठी सक्रिय असलेल्यांना काझी याने आर्थिक सहाय्य केल्याने टेरर फंडिंग केल्याचे त्याच्या आर्थिक व्यवहारावरुन उघड झाले आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. अशाच प्रकारे या चौघांच्या संपर्कात आणखी काही जण असल्याचे समोर येत आहे. या चौघांना समोरासमोर बसवून त्यांच्याकडे चौकशी करायची आहे. तसेच त्यांचा उद्देश काय होता, याचा तपास करायचा असल्याचे एटीएसने सांगितले.
कडेकोट बंदोबस्त
दहशतवाद्यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांना न्यायालयात आणताना मोठी खबरदारी घेण्यात येते. अगोदर अटक केलेल्यांना ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मंजूर झाली आहे. त्यामुळे सर्वांना न्यायालयात हजर करणे सोयीचे जाणे यासाठी काझी यालाही ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती एटीएसने केली.