अश्विनी बिद्रेंच्या नावाने पोलीस विभागाला मेसेज; हत्याकांडातील साक्षीदारांची सरतपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 07:45 AM2022-10-11T07:45:19+5:302022-10-11T07:46:07+5:30
आरोपी अभय कुरुंदकर याने अश्विनीच्या मोबाईलवरून पोलीस विभागाला सुट्टी मिळण्यासाठी पाठवलेले मेसेज, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी पनवेल सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात शुक्रवारी सायबर तज्ज्ञ अमित गाडेकर आणि पोलीस उपनिरीक्षक राजू बैकर या दोन साक्षीदारांची सरतपासणी करण्यात आली. साक्षीदारांनी नोंदवलेल्या साक्षीमुळे अश्विनी यांना मारहाण केल्याचे व्हिडिओ आणि अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यानंतर त्या जिवंत आहेत, हे भासवण्यासाठी आरोपी अभय कुरुंदकर याने अश्विनीच्या मोबाईलवरून पोलीस विभागाला सुट्टी मिळण्यासाठी पाठवलेले मेसेज, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
अश्विनी यांची हत्या ११ एप्रिल २०१६ रोजी झाली. न्यायाधीश के. जी. पढेलवार यांच्या न्यायालयात अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्याची सुनावणी सुरू आहे. सायबर संगणक तज्ज्ञ रोशन बंगेरा यांची साक्ष पूर्ण झाल्यानंतर सायबर तज्ज्ञ अमित गाडेकर आणि राजू बैकर यांची साक्ष नोंदवली गेली.
गाडेकर यांनी अश्विनी यांच्या लॅपटॉपच्या हार्ड डिस्कमधून मोठ्या प्रमाणात डाटा रिकव्हर केला होता. कुरुंदकरने केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ या लॅपटॉपमध्ये सेव्ह करण्यात आले होते. या सर्व पुराव्यांवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.