आई म्हणाली देवाघरी जायचे...! चिमुकल्यासह घेतली उडी; थोडक्यात वाचला मुलाचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 05:23 AM2022-12-07T05:23:18+5:302022-12-07T05:23:31+5:30
आईनं कवटाळल्यामुळे वाचले मुलाचे प्राण, त्रास देणारा पती अटकेत
नवी मुंबई : पाच वर्षांच्या मुलासह आईने सात मजली इमारतीच्या छतावरून उडी मारल्याची घटना कोपरखैरणे घडली. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला असून आत्महत्या करताना तिने मुलाला कवटाळून धरल्याने त्याचे प्राण वाचले. सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने हे कृत्य केले असून याप्रकरणी तिच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
कोपरखैरणे सेक्टर २० येथील न्यू रावची इमारतीमध्ये ही घटना घडली आहे. त्याठिकाणी आरती मल्होत्रा (३९) ही पती विजेंद्र मल्होत्रा, सासू किरण, नणंद अंजली यांच्यासह राहायला होती. २०१६ मध्ये तिचे लग्न विजेंद्रसोबत झाले होते. लग्नानंतर तिचा सतत छळ सुरू होता. यामुळे वर्षभरापूर्वीदेखील तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भावाने समजून काढत तिला धीर दिला होता. अखेर सोमवारी तिने पाच वर्षांचा मुलगा अर्विक याला कवटाळून सात मजली इमारतीच्या छतावरून उडी मारली.
त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला असून मुलगा थोडक्यात बचावला आहे. त्याच्या चेहऱ्याला व पायाला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सासरच्यांकडून छोट्या छोट्या कारणावरून आरतीचा छळ केला जात होता. तिला माहेरच्या व्यक्तींना भेटण्यासही मनाई केली जायची. तर लॉकडाऊनपासून घरूनच काम करणारी नणंददेखील सासू-सुनेत भांडणाची ठिणगी टाकत होती. आरतीने अनेकदा आई व भावाकडे वाच्यता केली होती. त्यामुळे तिच्या आत्महत्येनंतर भाऊ विशाल शर्मा याने बहिणीच्या सासरच्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याद्वारे सोमवारी रात्री सासरच्यांवर गुन्हा दाखल करून पती विजेंद्रला अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय भोसले यांनी सांगितले.
आई म्हणाली देवाघरी जायचे...
सात मजली इमारतीवरून पडूनही सुदैवाने पाच वर्षांच्या अर्विकचे प्राण वाचले आहेत. उपचारादरम्यान मामा त्याच्या भेटीसाठी गेला असता त्याने ‘आई रडत होती, म्हणाली देवाघरी जायचे...आणि आम्ही इमारतीवरून उडी मारली’ असे सांगितले. परंतु, उडी मारताना त्याला आईने कवटाळले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यामुळे जमिनीवर पडताना तो आईच्या अंगावर पडून थोडक्यात त्याचे प्राण वाचले. मात्र, मृत्यूला स्पर्श करून येणाऱ्या या घटनेमुळे त्यालाही मानसिक धक्का बसला आहे.