दोन हजारांचा माऊस पडला, ४१ हजारांना! सुटाबुटात येऊन मॅनेजरला गंडविले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 03:40 PM2023-05-15T15:40:58+5:302023-05-15T15:41:17+5:30
लोअर परळ परिसरात फिनिक्स पॅलेसमध्ये हे स्टोअर आहे. या ठिकाणी तक्रारदार सारिका (नावात बदल) या स्टोअर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
मुंबई : एन. एम. जोशी मार्ग पोलिसांच्या हद्दीमध्ये एका लॅपटॉप स्टोअरमध्ये काम करणाऱ्या स्टोअर मॅनेजरला सुटाबुटात आलेल्या भामट्याने माऊस खरेदीच्या बहाण्याने ४१ हजार ५०० रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
लोअर परळ परिसरात फिनिक्स पॅलेसमध्ये हे स्टोअर आहे. या ठिकाणी तक्रारदार सारिका (नावात बदल) या स्टोअर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. ९ मे रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सूटबूट घातलेला एक व्यक्ती अन्य एका महिलेसोबत त्यांच्या दुकानात आला. महिलेने लॅपटॉप पाहण्यास सुरुवात केली तर त्या व्यक्तीने सारिका यांना माऊसची किंमत विचारली.
डॉलरमध्ये याचे किती पैसे होतील, अशी विचारणा केली. त्यावर सारिका यांनी भारतीय चलनात २ हजार रुपये तर अमेरिकन डॉलरमध्ये २५ अमेरिकन डॉलर होतील, असे उत्तर त्याला दिले. तेव्हा त्याने ते डॉलर सारिका यांना देण्याचा प्रयत्न केला, ज्यावर त्यांनी या स्टोअरमध्ये ते चालत नसल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा त्याने पाचशे आणि हजार रुपयांची बंद झालेली नोट काढून त्यांना दिली. तीही स्वीकारत नसल्याचे म्हणत सारिका यांनी काऊंटरचा लॉकर उघडून त्यातील कॅश बॉक्स त्या ग्राहकाला दाखविला.
डाव्या खिशात घातल्या नोटा
सारिकाने शॉपचे सीसीटीव्ही फुटेज पडताळल्यावर सुटबुटात आलेल्या व्यक्तीनेच नोटा हातचलाखीने डाव्या खिशात घातल्याचे दिसले आणि गुन्हा दाखल करण्यात आला.
- त्या इसमाने पाचशेच्या नोटांचे बंडल घेऊन नोटा पाहिल्या आणि त्या विस्कळीत केल्या.
- सारिका यांनी त्याच्याकडून नोटा काढून घेतल्या आणि चांगली सेवा दिल्याबद्दल त्याने १० यूएस डॉलर त्यांना देऊ केले जे देखील सारिका यांनी स्वीकारले नाहीत.
- अखेर थोडा वेळ स्टोअर फिरल्यानंतर डॉलरचे रुपयांमध्ये एक्सचेंज कुठे करून मिळतील, असे विचारत पत्ता घेऊन ते दोघेही बाहेर निघून गेले.
- त्यानंतर सारिका यांनी नोटा मोजल्या तेव्हा त्यातून पाचशे रुपयांच्या ८३ नोटा म्हणजे ४१ हजार ५०० रुपये गायब होते.
- सारिका यांनी सहकाऱ्यांकडे कॅश बाबत विचारणा केली.