हॉटेलची तक्रार केल्याच्या कारणावरून मनपा कर्मचाऱ्यावर चाकूने वार
By सागर दुबे | Published: April 19, 2023 02:51 PM2023-04-19T14:51:37+5:302023-04-19T14:51:50+5:30
मनपा कर्मचारी मोहन बेंडाळे हे पार्वतीनगरमध्ये आई, पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत.
जळगाव : हॉटेलची राज्य उत्पादन शुल्क व मनपात तक्रार केल्याच्या कारणावरून मनपा कर्मचारी मोहन वासुदेव बेंडाळे (५४, रा.पार्वतीनगर) यांना एकाने मारहाण करून त्यांच्या हातावर चाकू सारख्या धारधार शस्त्राने वार केल्याची घटना सोमवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पार्वतीनगर येथे घडली.
मनपा कर्मचारी मोहन बेंडाळे हे पार्वतीनगरमध्ये आई, पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. दरम्यान, सोमवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास एक व्यक्ती बेंडाळे यांच्या घरासमोर येवून त्यांना व त्यांच्या पत्नीला हॉटेलची तक्रार करण्याच्या कारणावरून शिवीगाळ करू लागला.
बेंडाळे यांनी त्याला शिवीगाळ का करतो आहे, असे विचारल्यानंतर त्याने त्यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर चाकू सारख्या धारधार शस्त्राने त्यांच्या हातावर वार केला. त्यानंतर बेंडाळे यांची पत्नी, लहान भाऊ व त्याची पत्नी यांनी भांडण सोडविले. शेवटी मंगळवारी बेंडाळे यांनी तक्रार दिल्यानंतर रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.