पाच लाखांचे नवीन १८ मायक्राेस्काेप यंत्र रहस्यमयरित्या झाले लंपास

By दिलीप दहेलकर | Published: July 16, 2023 09:31 PM2023-07-16T21:31:14+5:302023-07-16T21:31:38+5:30

पाेलिसात तक्रार, जिल्हा हिवताप कार्यालयाच्या स्टाेअर रूममधील प्रकार

A new 5 lakh 18 Microscope device mysteriously disappeared | पाच लाखांचे नवीन १८ मायक्राेस्काेप यंत्र रहस्यमयरित्या झाले लंपास

पाच लाखांचे नवीन १८ मायक्राेस्काेप यंत्र रहस्यमयरित्या झाले लंपास

googlenewsNext

दिलीप दहेलकर, गडचिराेली: रक्ताचे नमुने तपासण्यासाठी उपयुक्त असलेले तब्बल पाच लाख रूपये किमतीचे नवीन १८ मायक्राेस्काेप यंत्र रहस्यमयरित्या लंपास झाल्याचा प्रकार गडचिराेली येथील जिल्हा हिवताप कार्यालयाच्या स्टाेअर रूममध्ये उघडकीस आला आहे. याबाबत प्रभारी भांडारप्रमुखांनी गडचिराेली पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याने आराेग्य विभागात खळबळ उडाली आहे.

जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत हिवताप नियंत्रणाचे काम जिल्हाभर केले जाते. यामध्ये मच्छरदाणी वाटप, रक्त नमुने तपासणी, औषधाेपचार, औषधी वितरित करणे, आराेग्य संस्थांमार्फत हिवताप नियंत्रित करणे आदी कामे केली जातात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या विभागाचा भाेंगळ कारभार या ना त्या कारणाने उजेडात येत आहे.

जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ. कुणाल माेडक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यालयाच्या वतीने शासनाकडे मायक्राेस्काेप यंत्र खरेदीसाठी निधीची मागणी करण्यात आली. दरम्यान, हिवताप कार्यालयाला एकूण २२ मायक्राेस्काेप यंत्र शासनाकडून मंजूर झाले. एप्रिल २०२३ मध्ये ७ व मे महिन्यात १५ अशा एकूण २२ मायक्राेस्काेप यंत्राची खरेदी करण्यात आली. यापैकी चार यंत्राचे वितरण आराेग्य संस्थांना करण्यात आले. १८ मायक्राेस्काेप स्टाेअररूममध्ये शिल्लक हाेते. ४ लाख ९८ हजार रूपये किमतीचे १८ मायक्राेस्काेप यंत्र लंपास झाल्याने या विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान तक्रारीवरून गडचिराेली पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविराेधात भादंविचे कलम ३८०, ४५४, ४५७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा तपास पाेलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस उपनिरीक्षक ए. एस. गवळी करीत आहेत.

गहाळ झाल्याचा कालावधी महिन्याभराचा

जिल्हा हिवताप कार्यालयाचे प्रभारी भांडारपाल अशाेक पवार यांनी मायक्राेस्काेप चाेरी झाल्याची तक्रार गडचिराेली पाेलिस ठाण्यात १४ जुलैला सायंकाळच्या सुमारास दाखल केली. १५ जून ते १२ जुलैदरम्यान सदर मायक्राेस्काेप स्टाेअररूममधून गायब झाल्याचे तक्रारीत नमुद आहे. स्टाेअररूमलगतच्या बाथरूमच्या खिडकीची ग्रील तुटलेली दिसली. चाेरांनी तिथून प्रवेश करून हे साहित्य लंपास केले, असे तक्रारीत म्हटले आहे. तब्बल महिनाभराच्या कालावधीत साहित्य गहाळ झाल्याचे दर्शविण्यात आल्याने यात संशय निर्माण हाेत आहे.

चाेरीची दुसरी वेळ

सदर हिवताप कार्यालयातून २०२०-२१ या वर्षात अशाच प्रकारच्या साहित्याची चाेरी झाल्याची घटना घडली हाेती. मात्र त्यानंतरही स्टाेअर रूम व कार्यालयाच्या कारभारात सुधारणा झाली नाही. काॅम्प्लेक्स परिसरातील बॅरेजमध्ये विविध विभागाचे शासकीय कार्यालये आहेत. मात्र गेल्या इतक्या वर्षभरात साहित्याची चाेरी झाली नाही. मात्र तज्ज्ञ व आराेग्य विभाग वगळता इतर काेणासाठीही उपयुक्त न ठरणारे मायक्राेस्काेप या कार्यालयातून चाेरी गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे

Web Title: A new 5 lakh 18 Microscope device mysteriously disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.