डॉलरच्या बहाण्याने २ लाखाचा गंडा; दोघांवर गुन्हा
By सूर्यकांत वाघमारे | Published: December 18, 2023 03:52 PM2023-12-18T15:52:11+5:302023-12-18T15:52:19+5:30
कांदिवलीतल्या व्यक्तीची घणसोलीत फसवणूक
नवी मुंबई : स्वस्तात डॉलर देण्याच्या बहाण्याने कांदिवलीतल्या व्यक्तीची घणसोलीत फसवणूक झाली आहे. याप्रकरणी दोघांवर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. स्वस्तात डॉलर मिळत असल्याने पत्नीचे दागिने गहाण ठेवून त्यांनी रक्कम जमा केली होती.
कांदिवली येथे राहणाऱ्या गुफरान अफसर अली सिद्धीकी (४१) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांना एका व्यक्तीने फोन करून तो नारळपाणीवाला असल्याचे सांगितले होते. तसेच त्याने आपल्याकडे अमेरिकन डॉलर असून ते स्वस्तात देतो असेही सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून गुफरान यांनी एपीएमसी परिसरात त्यांची भेट घेऊन डॉलरची पाहणी केली होती. यामुळे स्वस्तात डॉलर घेऊन फायदा होणार असल्याने त्यांनी पत्नीचे दागिने गहाण ठेवून दोन लाख रुपये जमवले होते.
रविवारी सकाळी घणसोली येथील डीमार्ट परिसरात त्यांची भेट झाली असता, अज्ञात दोघांनी त्यांच्याकडील डॉलरचा बंडल गुफरान यांना देऊन त्यांच्याकडील दोन लाख रुपये स्वतकडे घेतले. मात्र सार्वजनिक ठिकाण असल्याने इथे बंडल उघडू नका असे सांगून ते तिथून निघून गेले. काही वेळाने त्यांनी बंडल उघडला असता त्यामध्ये डॉलर ऐवजी डॉलरच्या आकाराचे कागद आढळून आले. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता अज्ञात दोघांवर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.