मुझे छुट्टा चाहिए...म्हणत लुबाडले; युनियन बँकेच्या बोरिवली शाखेतीला प्रकार
By गौरी टेंबकर | Published: October 7, 2023 03:07 PM2023-10-07T15:07:42+5:302023-10-07T15:07:58+5:30
या विरोधात बोरिवली पोलिसात धाव घेतल्यानंतर भारतीय दंड संहिता कलम ४१९,४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
मुंबई: बोरिवली परिसरात सुट्टे पैसे मागण्याच्या बहाण्याने चिराग वानिया (२४) नावाच्या नोकरदाराला गुरुवारी १० हजार रुपयांना फसवण्यात आले. याप्रकरणी त्यांनी बोरिवली पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वानिया हे बोरिवलीमध्ये एका हार्डवेअरच्या दुकानात कामाला आहेत. त्यांच्या मालकाने त्यांना ५ तोवर रोजी पावणे बारा वाजता युनियन बँकेचा १० रुपयांचा चेक देत तो विड्रॉल करून आणायला सांगितला. तेव्हा मानिया बँकेत गेले आणि त्यांनी कॅशियर कडून १० हजार रुपये घेतले. ते पैसे मोजत असताना त्यामध्ये ५००,२००,१००,२० आणि १० रुपयांच्या नोटा होत्या.
वानिया यांच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला आणि मुझे छूट्टा पैसा चाहिये आप मुझे दोघे क्या? अशी विचारणा केली. वानिया यांनी त्याला होकार देताच आप बाहर चलो असे त्याने सांगितले. वानिया बाहेर जाताच रुमाल हातात देत यात पाचशे रुपयांची गड्डी आहे, तुमच्याकडचे पैसे मला द्या आणि हे पैसे तुम्ही ठेवा असे अनोळखी इसमाने वानिया यांना सांगितले. इतकेच नव्हे तर पैशासोबत घरी फोन करायचा आहे असे सांगून तक्रारदाराचा फोनही घेऊन तो पसार झाला. रुमाल तपासल्या नंतर त्यात कागदाचे कपटे आढळले. या विरोधात बोरिवली पोलिसात धाव घेतल्यानंतर भारतीय दंड संहिता कलम ४१९,४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.