ओएलएक्सवर विक्रीला ठेवलेला फोन पळवला; चोराला सायन स्टेशनवरुन अटक
By गौरी टेंबकर | Published: October 25, 2023 05:59 PM2023-10-25T17:59:28+5:302023-10-25T17:59:45+5:30
धारावी पोलिसांची कारवाई
मुंबई: ओएलएक्सवर विक्रीला ठेवलेला फोन खरेदी करायचा असल्याचे सांगत तो पळवून नेणाऱ्या आसिफ हुसेन आरिफ हुसेन शेख, उर्फ भुरा (४०) नामक चोराला मंगळवारी अटक करण्यात आली जो मूळचा गुजरातचा रहिवासी आहे. धारावी पोलिसांनी सायन रेल्वे स्टेशन वरून त्याच्या मुसक्या आवळल्या असून अधिक तपास सुरू आहे.
सदर प्रकरणातील फिर्यादीने त्यांचा जवळपास १ लाख १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल ओएलएक्सवर विक्रीकरीता ठेवला होता. आरोपीने १९ जुलै रोजी त्यांना संपर्क करून धारावीच्या पर्ल रेसिडेन्सी येथे बोलावले. त्यांच्याकडून मोबाईल घेवून पैसे घेवून येतो अशी बतावणी करून बिल्डिंगच्या लिफ्टने पर्किगमध्ये उतरून पळून गेला. याप्रकरणी धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय खंडागळे आणि पथकाने आरोपीचा उपलब्ध सीसीटीव्ही तसेच फिर्यादिला मोबाईल घेण्यासाठी संपर्क केलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे शोध घेतला. तेव्हा त्या मोबाईलचे लोकेशन पुण्यातील स्वारगेट असे दिसले.
प्रथम तिथे त्याचा शोध घेतला परंतू आरोपी न सापडल्याने सीम कार्ड धारकाचा एसडीआर प्राप्त करून शोध घेतला गेला. तेव्हा तो मोबाईलही गोरेगावमधून एका रिक्षा चालकाकडून चोरी झाल्याचे समजले. आरोपीने भांडुप ,घाटकोपर पोलीस ठाणे हद्दीत अशाच प्रकारचे गुन्हे केल्याने तपास अधिकाऱ्यांना सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले. त्याच्या मोबाईल सीडीआरवरून तो भायखळा-सायन-कुर्ला या परीसरात वारंवार येत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सायन स्टेशन परीसरात खबरीच्या मदतीने त्याचा गाशा गुंडाळला. त्याच्यावर अहमदाबादमध्ये विविध पोलीस ठाण्यात १२ तर घाटकोपर, भांडुप आणि टिळक नगरमध्ये प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.