फडणवीसांना अडकवण्यासाठी बाप-लेकीनं रचला होता नियोजित ट्रॅप; तपासात मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 08:40 AM2023-03-24T08:40:41+5:302023-03-24T08:41:41+5:30
पोलिसांनी अनिक्षाच्या घरी धाड टाकत तिथून डिझाईनर कपडे आणि विविध सामान जप्त केले. हे कपडे आणि साहित्य तिने कुणाकडून घेतले याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणारे आरोपी अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षाबाबत पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. अमृता फडणवीस यांना कुठला मेसेज पाठवायचा याबाबत बाप-लेकीमध्ये आधी चर्चा व्हायची असं पोलिसांच्या तपासात आढळले आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, अमृता फडणवीस यांच्या मोबाईलवर कुठलाही व्हॉट्सअप मेसेज पाठवण्याआधी अनिक्षा तिच्या वडिलांशी चर्चा करायची. तपासावेळी पोलिसांना एक मोबाईल आणि त्यातील मेसेजचे स्क्रीनशॉट्स सापडले जे अमृता फडणवीस यांना पाठवले जाणार होते. या बाप लेकींमध्ये खूपदा चर्चा व्हायची. त्यामुळे बाप-लेक मिळून अमृता फडणवीसांना फसवण्याचा कट रचत होते हे स्पष्ट झाले आहे.
इतकेच नाही तर काही वर्षांपूर्वी अनिक्षा अमृता फडणवीसांना एक फॅशन डिझाईनर म्हणून भेटली. परंतु ती फॅशन डिझाईनर नसून कायद्याचा अभ्यास करणारी विद्यार्थिनी असल्याचे तपासात पुढे आले आहे. अनिक्षा जयसिंघानीने या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत केवळ २ जणांची नावे घेतली आहेत. मात्र ती पोलिसांची दिशाभूल करत असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी अनिक्षाने तिच्या व्यवसायाबाबत खोटी माहिती दिली असण्याची शक्यता आहे असं पोलिसांनी म्हटलं.
पोलिसांनी अनिक्षाच्या घरी धाड टाकत तिथून डिझाईनर कपडे आणि विविध सामान जप्त केले. हे कपडे आणि साहित्य तिने कुणाकडून घेतले याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनिक्षाचे नातेवाईक निर्मल जयसिंघानी हेदेखील या प्रकरणात आरोपी आहेत. ज्यांचे रेडिमेड कपड्यांचे शोरूम आहे. परंतु ते डिझाईनर कपडे विकत नाहीत. अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी २० मार्चला बाप-लेकीविरोधात षडयंत्र रचून बळजबरीने ब्लॅकमेलिंग आणि लाच ऑफर केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
१ कोटींची लाच दिल्याचा आरोप
अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल आणि लाच देण्याचा आरोप अनिक्षा जयसिंघानीवर आहे. १६ मार्चला हे प्रकरण उघडकीस आले होते. अनिक्षाने वडिलांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी अमृता फडणवीस यांना १ कोटींच्या लाचची ऑफर केली होती. त्यानंतर ब्लॅकमेलिंगची धमकीही दिली. २० मार्चला पोलिसांनी अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघानीला गुजरातहून अटक केली. बाप-लेकीनं मिळून फडणवीसांना अडकवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. पोलीस या प्रकरणात आणखी कुणाचा हात आहे का याचाही शोध घेत आहेत.