१० सेकंदात ४ वेळा चक्कर येऊन पोलीस कॉन्स्टेबल रेल्वे ट्रॅकवर कोसळला अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 10:40 PM2022-03-27T22:40:30+5:302022-03-27T22:40:48+5:30
आग्राच्या राजा मंडी रेल्वे स्टेशनमध्ये जीआरपी चौकीत ड्युटीला असणारे कॉन्स्टेबल रिंगल कुमार सिंह शनिवारी रात्री प्लॅटफोर्म नंबर २ वर तैनात होते.
आग्रा – शहरातील राजा मंडी रेल्वे स्टेशनवर घडलेल्या ह्दयद्रावक घटनेनं अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. रेल्वे स्टेशनवर तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला अचानक चक्कर आल्यानं ही दुदैवी दुर्घटना घडली आहे. ही घटना रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
आग्राच्या राजा मंडी रेल्वे स्टेशनमध्ये जीआरपी चौकीत ड्युटीला असणारे कॉन्स्टेबल रिंगल कुमार सिंह शनिवारी रात्री प्लॅटफोर्म नंबर २ वर तैनात होते. रात्री ९.३१ च्या सुमारास स्टेशनवरून एक मालगाडी क्रॉस करणार होती. त्यावेळी ड्युटीवर असलेले रिंगल कुमार सिंह यांची अचानक तब्येत बिघडली. ९ वाजून ३१ मिनिटं ५० सेकंदावर रिंगल कुमार सिंह हे त्यांच्या जागेवर उभे असताना ते चक्कर येत असल्याने कोसळण्याच्या स्थितीत होते. ४ सेकंद चक्कर आल्यानं त्यांचा शारिरीक तोल ढासळला.
रिंगल कुमार सिंह प्लॅटफोर्मच्या बाजूला रेल्वे ट्रॅकवर कोसळले तेव्हा आलेल्या मालगाडीच्या चाकाखाली ते गेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. कॉन्स्टेबल रिंगल कुमार सिंह यूपीच्या बिजनौर भागात राहायला होते. जीआरपी कॉन्स्टेबल रिंगल कुमार मालगाडीच्या खाली आल्याची घटना सर्वात आधी ट्रेनचे टीसी यांनी पाहिली आणि ते धावत घटनास्थळी पोहचले. मात्र तोवर कॉन्स्टेबलच्या शरीरावर मालगाडीचे ११ डबे गेले होते. रिंगल कुमार प्लॅटफोर्म आणि ट्रॅकच्या मध्ये अडकले होते. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात पोहचवले परंतु उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. मृत कॉन्स्टेबलला २ मुले आहेत. मागील वर्षी जीआरपीमध्ये त्यांचे पोस्टिंग झाले होते. २०११ मध्ये यूपी पोलिसमध्ये ते भरती झाले होते. रिंगल कुमार सिंहच्या अचानक जाण्यानं त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.