नाशिक: वावीच्या गणपती मंडळातून सव्वा किलो चांदीची गणेश मूर्तीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2022 07:46 PM2022-09-09T19:46:12+5:302022-09-09T19:46:30+5:30
वावी येथील इच्छामणी व्यापारी ग्रुप मित्र मंडळाची सुमारे सव्वाकिलो वजनाची चांदीची गणेशमूर्ती चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली.
सिन्नर जि नाशिक (शैलेश कर्पे) : तालुक्यातील वावी येथील इच्छामणी व्यापारी ग्रुप मित्र मंडळाची सुमारे सव्वाकिलो वजनाची चांदीची गणेशमूर्ती अनंतचतुर्दशीच्या दिवशी पहाटे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. वावी पोलिसांनी सायंकाळपर्यंत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे हाती लागून आले नव्हते. सकाळी या मंडळाचे गणेश विसर्जन शांततेत करण्यात आले.
वावी येथील बस स्थानकाशेजारी व ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात इच्छामणी व्यापारी ग्रुपच्या गणेशाची स्थापना करण्यात आली होती. गेल्या चौदा वर्षांपासून हे मंडळ गणेश स्थापना करते. मंडळाने आठ ते दहा वर्षांपूर्वी चांदीची सव्वा किलो वजनाची श्रींची मूर्ती बनवली असून उत्सवा दरम्यान ही मूर्ती मंडपात ठेवण्यात करण्यात येते. या गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातून सव्वा किलो चांदीचे श्रींची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पहाटे पहाटे सहा वाजेच्या सुमारास चोरीचा प्रकार निदर्शनास आला.
बंदोबस्तासाठी दोन गृहरक्षक दलाचे जवान मंडपासमोर तैनात होते. तथापि, चोरट्यांनी मंडपाच्या पाठीमागील पडदा उचकवून आत प्रवेश केला चांदीची सव्वा किलो वजनाची मूर्ती लंपास केली. घटनेची माहिती गावात पसरतात मंडळाच्या परिसरात ग्रामस्थांनी गर्दी केली होती. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते व पोलिसांकडून शोध मोहीम राबवण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांचे पथकही चौकशीसाठी वावी येथे हजर झाले होते. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनीही वावी येथे धाव घेऊन तपास कामी सूचना केल्या. समोरच असलेल्या ग्रामपंचायतच्या सीसीटीव्ही कॅमेरात तपासणीचे काम सुरू होते.