गुरूचा शाप लागेल, असे सांगत बलात्कार; आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 09:28 AM2022-09-12T09:28:06+5:302022-09-12T09:28:22+5:30
२०१९ मध्ये पीडितेला स्वतःच्या घरी बोलावले आणि प्रसादात गुंगीचे औषध मिसळून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला.
मुंबई : कुटुंबीयांना गुरूचा शाप लागेल अशी भीती घालत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. पीडिता पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याचे समजते.
नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर याप्रकरणी वर्सोवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव सुरेशकुमार अवस्थी (वय ५८) असे असून, तो आयटी कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये कार्यरत आहे. अंधेरीच्या म्हाडा परिसरात तो राहतो. आपल्याकडे दैवी शक्ती आहेत असे भासवत त्याने पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. २०१९ मध्ये पीडितेला स्वतःच्या घरी बोलावले आणि प्रसादात गुंगीचे औषध मिसळून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी ती अल्पवयीन होती.
त्याने या सगळ्या प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. त्याचा वापर करून सुरेशकुमार पीडितेवर अत्याचार करत होता. तिला त्याने कुर्ला आणि अंधेरी परिसरात त्याच्या निवासस्थानी नेऊन तिथेही अत्याचार केले. सुरेशकुमारविरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम ३७६, ३२८, ५०६ (२) व पॉक्सो कायदा २०१२ च्या कलम ३, ४ आणि ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.