‘उडता पंजाब’ची पुनरावृत्ती, कंटेनरला पोकळ फ्रेम करून दुबईतून मुंबईत हेरॉईनची तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 06:29 AM2022-07-16T06:29:39+5:302022-07-16T06:30:05+5:30

जेएनपीटीतून ३६२ कोटींचा माल जप्त, कस्टमच्या ताब्यात होता कंटेनर

A repeat of Udta Punjab smuggling heroin from Dubai to Mumbai by framing the container hollow | ‘उडता पंजाब’ची पुनरावृत्ती, कंटेनरला पोकळ फ्रेम करून दुबईतून मुंबईत हेरॉईनची तस्करी

‘उडता पंजाब’ची पुनरावृत्ती, कंटेनरला पोकळ फ्रेम करून दुबईतून मुंबईत हेरॉईनची तस्करी

Next

नवी मुंबई : नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी रात्री जेएनपीटी बंदर परिसरातून ३६२.५९ कोटी रुपयांचे शु्द्ध रॉईन जप्त केले आहे. दुबईमधून आलेल्या कंटेनरमध्ये हे ड्रग्स लपवले होते. धक्कादायक म्हणजे या कंटेनरचा ताबा कोणीच न घेतल्याने सात महिन्यांपासून तो कस्टमच्या ताब्यात होता. तरीही लपविलेल्या हेरॉईनचा थांगपत्ता न लागल्याने या बंदरातील स्कॅनिंग यंत्रणेचेही बिंग फुटले आहे.

पंजाब पोलिसांच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेलला या ड्रग्सबाबत माहिती मिळाली होती. या पथकाचे अधिकारी कोमलप्रीत सिंग यांनी नवी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यानुसार आयुक्त बिपीनकुमार सिंह, अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी विशेष पथक तयार केले होते. त्यांनी बुधवारी रात्री जेएनपीटी परिसरात पाहणी करून संशयित कंटेनरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर गुरुवारी सकाळी कस्टमच्या ताब्यातील हा कंटेनर पोलिसांच्या नजरेस पडला. कौशल्यपूर्ण तपासात या कंटेनरमध्ये लपवलेले हेरॉईनचे १६८ पॅकेट आढळून आले.

७२ किलो ५१८ ग्रॅमचे हे ड्रग्स असून, प्रतिकिलो ५ कोटीप्रमाणे त्याची सुमारे ३६२ कोटी ५९ लाख रुपये किमत असल्याचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी सांगितले. केवळ शंकेच्या आधारे त्यांनी नवी मुंबई पोलिसांची मदत घेऊन शोधमोहीम राबवून मोठ्या प्रमाणात हेरॉईनचा साठा जप्त केला.

दुबईतून आला माल
हा कंटेनर दुबई येथून आला असून, त्यात मार्बल भरलेले होते. परंतु, डिसेंबरमध्ये तो जेएनपीटीमध्ये येऊनदेखील संबंधितांनी त्याचा ताबा न घेतल्याने तो कस्टमच्या ताब्यात ठेवला होता. यामुळे परदेशातून येणाऱ्या कंटेनरच्या तपासणीची स्कॅनिंग प्रक्रिया फेल ठरल्याचे यावरून दिसून येत आहे. कंटेनर मागवणाऱ्या कंपनीची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, त्याद्वारे ड्रग्स तस्करीत समाविष्ट असलेल्यांचा शोध सुरू असल्याचेही सिंह यांनी सांगितले.

दुबार पाहणीत उलगडा

  • संशयास्पद कंटेनर हाती लागला असता त्यामध्ये अफगाणी मार्बल आढळून आले. परंतु, मिळालेली माहिती खात्रीशीर असल्याने पोलिसांनी अनेक तास कंटेनरची अंतरबाह्य भागाची पाहणी केली.
  • त्यामध्ये इतर कंटेनरपेक्षा या कंटेनरला बाहेरून वेगळी फ्रेम असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गॅस कटरच्या साहाय्याने फ्रेम कापल्यानंतर त्यात लपवलेले ड्रग्स हाती लागले.
     

कंटेनरभोवती बनवली फ्रेम
अफगाणी मार्बल वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या या कंटेनरच्या चारही बाजूने व दरवाजाला लोखंडी पोकळ फ्रेम तयार केली आहे.
 त्यामध्ये छोट्या छोट्या पॅकेटमध्ये भरलेले हे हेरॉईन लपवले होते. त्यामुळे कंटेनरची पाहणी करूनदेखील ते नजरेस पडत नव्हते. तर अशा प्रकारे ड्रग्स वाहतुकीसाठीच हा कंटेनर तयार केल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: A repeat of Udta Punjab smuggling heroin from Dubai to Mumbai by framing the container hollow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.