'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या सेवानिवृत्त सैनिकाची गोळी झाडून आत्महत्या
By राम शिनगारे | Published: September 18, 2022 11:27 PM2022-09-18T23:27:50+5:302022-09-18T23:28:17+5:30
वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त : चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
औरंगाबाद : वर्षभरापूर्वी लष्करी सेवेतून निवृत्त झालेल्या सैनिकांने डोक्यात गोळी घालुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. डोक्यात गोळी आरपार गेल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सैनिकाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केल्याची माहिती निरीक्षक देविदास गात यांनी दिली.
संजय उर्फ संजीव कौशलसिंग राठोर (३८, रा. अहमदाबाद, गुजरात, ह.मु. भांगसीमाता हौसिंग सोसायटी, फतेपुर शिवार) असे आत्महत्या केलेल्या सेवानिवृत्त सैनिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय राठोर हे वर्षभरापूर्वी लष्कारातुन सैनिक या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. त्याचे संपूर्ण कुटुंब गुजरातमधील अहमदाबाद येथे राहते. काही वर्षापूर्वी त्यांची फतेपुर शिवारातील एका महिलेसोबत फेसबुकच्या माध्यमातुन ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यातुन दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. रविवारी दुपारी संजय राठोर यांनी साेबतच्या महिलेला दारु विकत आणण्यासाठी बाहेर पाठवले होते. त्या दारु घेऊन परतल्यानंतर घराचे दरवाजे बंद होते. आतुन आवाज दिल्यानंतरही संजय यांनी प्रतिसाद दिला नाही. तेव्हा पोलिसांना बोलावण्यात आले.
पोलिसांच्या उपस्थितीत दरवाजा तोडल्यानंतर संजय हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांनी डोक्यात गोळी घालुन आत्महत्या केल्याचे घटनस्थळावरुन स्पष्ट झाले. त्यांना सुरुवातीला खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यानंतर घाटीत हलवले. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर, निरीक्षक देविदास गात यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी केली. मृताच्या पश्चात पत्नी, मुले, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.