मोटारसायकलची चोरी करणारा सुरक्षारक्षक १२ तासांत ताब्यात, ठाण्यातील कारवाई
By जितेंद्र कालेकर | Published: May 24, 2023 10:20 PM2023-05-24T22:20:31+5:302023-05-24T22:21:42+5:30
कापूरबावडी पोलिसांची कारवाई : मोटारसायकल हस्तगत
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मोटारसायकलची चोरी करणाऱ्या सर्वेशकुमार विनोद मिश्रा (३५, रा. वाघबीळ, ठाणे) या सुरक्षारक्षक आरोपीला अवघ्या १२ तासांत अटक केल्याची माहिती कापूरबावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम सोनवणे यांनी दिली. त्याच्याकडून चोरीची मोटारसायकलही हस्तगत केल्याचे त्यांनी सांगितले.
घोडबंदर रोड येथील प्राईड पार्क येथील ऋषीकुमार सोनी (५०) यांची मोटारसायकल १८ मे २०२३ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास चोरीस गेली होती. इमारतीच्या पार्किंगमधील आपली दीड लाखाची ही मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार सोनी यांनी २० मे रोजी दाखल केली होती. या चोरीची वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी दखल घेतली. त्यानुसार पोलिस निरीक्षक संजय निंबाळकर, संदीप धांडे आणि सहायक पोलिस निरीक्षक एस. एन. पिंपळे यांच्या पथकाने या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यानुसार या सोसायटीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरक्षारक्षक असलेला मिश्रा यानेच या मोटारसायकलची चोरी केल्याचे तांत्रिक विश्लेषणावरूनही उघड झाले. कापूरबावडी पोलिसांनी त्याला मध्य प्रदेशातील नांगलवाडी (जि. बडवानी) येथून ताब्यात घेतले.