संगणक पार्ट विक्रीच्या नावाखाली दुकानातच चालवायचा सेक्स रॅकेट, दलालास अटक
By जितेंद्र कालेकर | Published: May 16, 2024 10:05 PM2024-05-16T22:05:13+5:302024-05-16T22:09:31+5:30
डोंबिवलीत छापा, दोन पीडितांची सुटका
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: संगणक पार्ट विक्रीच्या दुकानाआडून काही तरुणींकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी दिली. त्याच्या तावडीतून दोन पीडित तरुणींची सुटका केली.
डोंबिवलीच्या दावडी भागातील रिजेन्सी इस्टेट परिसरातील एका इमारतीमधील दुकानात संगणकाच्या सुट्या भागांच्या विक्रीच्या नावाखाली काही तरुणींकडून सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या पथकाने १० मे २०२४ रोजी सायंकाळी चार ते सहा वाजण्याच्या दरम्यान आयुष ट्रेडर्स ऑफिस या ठिकाणी सापळा रचून एका दलालास ताब्यात घेतले. त्याच्या तावडीतून दोन पीडित तरुणींची सुटका केली. या आरोपीविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात कलम ३७० सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला. पीडित तरुणींना उल्हासनगरच्या सुरक्षागृहात ठेवण्यात आले आहे. या दलालाने आणखी किती तरुणींना या जाळ्यात ओढले आहे, त्याचे आणखी किती साथीदार आहेत, या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाने दिली.