पत्नीवर जादूटोणा केल्याचा संशय; रात्री चौकात पकडले, मांडीवर अन् गुप्तांगावर वार केले!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 03:06 PM2022-12-27T15:06:14+5:302022-12-27T15:06:46+5:30

अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन अघोरी कृत्य

A shocking incident has come to light that a youth was stabbed to death in Pusad village in Yavatmal. | पत्नीवर जादूटोणा केल्याचा संशय; रात्री चौकात पकडले, मांडीवर अन् गुप्तांगावर वार केले!

पत्नीवर जादूटोणा केल्याचा संशय; रात्री चौकात पकडले, मांडीवर अन् गुप्तांगावर वार केले!

googlenewsNext

पुसद: आपल्या पत्नीवर जादूटोणा केल्याच्या संशयावरून एकाने शेजारी राहणाऱ्या युवकास भर चौकात चाकूने भोसकून ठार केले. ही घटना येथील सुभाष चौकात रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

अमोल तुकाराम धुळे (३५, रा. शिवाजी वॉर्ड) असे मृताचे नाव आहे. रमेश वसंता पवार (३८) असे आरोपीचे नाव आहे. अमोल धुळे व रमेश पवार शिवाजी वॉर्डात शेजारी राहतात. अमोलने आपल्या पत्नीवर जादूटोणा केल्याचा रमेशला संशय होता. रविवारी रात्री अमोल कापड दुकानातून आपले काम आटोपून घरी परत जात होता. सुभाष चौकात रात्री ९.३० वाजताच्या सुमारास रमेशने अमोल याला अडवून चाकूने मांडीवर व गुप्तांगावर सपासप वार केले. यात अमोल जागीच ठार झाला. अमोल धुळे अतिशय मनमिळावू स्वभावाचा व निर्व्यसनी होता. तो एका कापड दुकानात काम करीत होता. 

आरोपी रमेश पवार हा घटनेनंतर कपडे बदलून पळण्याच्या तयारीत होता. गोपनीय माहिती वरून पोलिस उपनिरीक्षक राजू खांदवे व त्यांच्या पथकाने एका तासातच आरोपीस शिताफीने पकडले. त्याच्याविरुद्ध अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायदा आणि भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. तपासात निरीक्षक दिनेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजू खांदवे, हेड कॉन्स्टेबल जलाल शेख, कॉन्स्टेबल सिद्धोधन भगत,आकाश बाभूळकर यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.

ग्रामीण भागात अंधश्रद्धेचे लोन अजूनही कायम-

अंधश्रद्धा समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शासनाने जादूटोणा विरोधी कायदा केला आहे. मात्र, त्यानंतरही ग्रामीण भागात अंधश्रद्धेच्या आहारी जावून अघोरी कृत्य केले जाते. कुणाचा जीवघेण्यापर्यंत सुडाची भावना यातून निर्माण होते. शहरी भागातसुद्धा अंधश्रद्धेचे प्रमाण कायम आहे. सुशिक्षित वर्गही यावर विश्वास ठेवतो, हीच शोकांतिका ठरत आहे. गेल्या वर्षात उमरखेड, महागाव, पुसद या परिसरातील दुर्गम भागात अंधश्रद्धेतून खुनासारख्या गंभीर घटना घडल्या आहेत. यामागे तोकडी असलेली वैद्यकीय सुविधाही कारणीभूत ठरत असल्याचे जाणकरांचे म्हणणे आहे.

Web Title: A shocking incident has come to light that a youth was stabbed to death in Pusad village in Yavatmal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.