जिवंत असतानाच कापले शरीराची अनेक भाग; थरकाप उडवणारी घटना, पोलिसही हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 12:56 PM2022-12-07T12:56:01+5:302022-12-07T12:56:32+5:30
श्रद्धा हत्याकांडची बिहारमध्ये पुनरावृत्ती...
नवी दिल्ली: श्रद्धा हत्याकांडाशी मिळतीजुळती घटना बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात घडली आहे. महिलेवर वाईट नजर असलेल्या तरुणाचे कुटुंबीयांनी घरी येणे जाणे बंद केल्यानंतर त्याने भावाच्या मदतीने महिलेची हत्या केली.
महिला जिवंत असतानाच धारदार शस्त्राने त्यांनी तिच्या शरीराचे अनेक भाग कापले. नीलम देवी (वय ४०) असे मृत महिलेचे तर मोहंमद शकील, मोहंमद शेख जुद्दीन अशी आरोपींची नावे आहेत.छोटी दिलौरी येथील रहिवासी अशोक यादव यांच्या घरी मो. शकील याचे येणे जाणे होते.
शकीलची अशोक यांची पत्नी नीलम देवीवर वाईट नजर होती. तो काही ना काही निमित्त करून घरी यायचा आणि नीलम यांना त्रास द्यायचा. ही बाब समजल्यानंतर अशोक यांनी त्याचे घरी येणे-जाणे बंद केले. त्यामुळे नाराज शकीलने नीलम यांचा काटा काढण्याचा कट रचला.
नीलम देवी रस्त्याने जात असताना त्याने पाठीमागून त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात ढकलले. तेथे आधीच त्याचा भाऊ मोहंमद शेख जुद्दीन दबा धरून बसलेला होता. नीलम देवी शेतात कोसळताच आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि त्या जिवंत असतानाच त्यांचे हात, कान व स्तन कापले .पाय कापण्याचाही त्यांचा प्रयत्न होता. मात्र, कोणाची तरी चाहूल लागल्याने आरोपी पळून गेले.
नीलम देवी यांना रुग्णालयात नेण्यात येत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. अशोक यादव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, मोहंमद शेख जुद्दीन याला अटक करण्यात आली आहे. आरोपी शकील याला पकडण्यासाठी पोलिस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"